किती जणांना डार्विनचा उत्क्रांतीवाद योग्य वाटतो ?

लहानपणापासून शाळेत आपल्याला शिकवण्यात येतो, तो डार्विनचा उत्क्रांतीवाद ! त्याच्यानुसार मानव हा प्राणी माकडापासून उत्क्रांती करत निर्माण झालेला आहे; परंतु गेल्या ५ सहस्र वर्षांपासून एकतरी उदाहरण आपल्याला सापडलेले आहे का की, माकडापासून मनुष्य निर्माण झालेला आहे ? त्याचे उत्तर ‘नाही’ असेच आहे. तरीही शिक्षणतज्ञ त्याचा विचार करत नाहीत. डार्विनचे चुकीचे तत्त्वज्ञान आपल्याकडून अजूनपर्यंत पाठ करून घेतले जाते. आपल्याला अध्यात्म आणि धर्मशास्त्र वेगळे सांगत आहे अन् ते शास्त्र कधीच पालटत नाही; कारण ते सत्य आहे. ईश्वराने जेव्हा सृष्टी निर्माण केली, तेव्हा आधी त्याने वनस्पती, नंतर जलचर, इतर प्राणी, पक्षी आणि सर्वांत शेवटी मनुष्यप्राणी निर्माण केला. त्याला विशेष म्हणजे बुद्धी दिली. असे सत्य असतांना डार्विनचा उत्क्रांतीवाद आतातरी चुकीचा आहे, हे लक्षात घ्यायला नको का ? माकडाच्या वेगवेगळ्या पोटजाती आहेत. त्यात वानर, खेते, चिंपांझी इत्यादी. चिंपांझी तर मनुष्याप्रमाणे चालतात; परंतु ते माणसासारखे बोलू शकत नाहीत. त्यासाठी अशा प्रकारचा डार्विनचा चुकीचा उत्क्रांतीवाद भारतीय शिक्षणातून वगळला पाहिजे; कारण तो वाद आपल्या शास्त्राच्या विरोधात आणि चुकीचा आहे. सरकार आणि शिक्षणतज्ञ यांनी याकडे लक्ष देऊन शालेय शिक्षणात सुधारणा करणे आवश्यक आहे, तसेच सनातन धर्म आणि अध्यात्मशास्त्र शालेय अन् महाविद्यालयीन शिक्षणात अंतर्भूत केले पाहिजे, अशी मागणी सर्वांनी करायला हवी.

– श्री. श्रीराम खेडेकर, बांदोडा, फोंडा, गोवा. (२०.१०.२०२२)