आईच्या दुधात ‘मायक्रोप्लास्टिक’ आढळणे हे पुढच्या पिढीसाठी धोकादायक !

‘पॉलिमर’ जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार मानवी दुधात प्लास्टिकचे कण आढळले आहेत. या नव्या माहितीमुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. ‘आईच्या दुधात जर प्लास्टिकचे कण आढळत असतील, तर आगामी नवजात बालके आणि पुढची पिढी यांसाठी हे धोकादायक आहे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झालेला हा अभ्यास काय आहे ? ते येथे देत आहोत.

१. आईच्या दुधामध्ये आढळलेल्या मायक्रोप्लास्टिकचा नवजात बालकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता असणे

‘पॉलिमर’ जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार मानवी दुधात ५ मिलिमीटरपेक्षा न्यून आकाराचे मायक्रोप्लास्टिकचे कण आढळले आहेत. हा अभ्यास करण्यासाठी रोममधील एकूण ३४ निरोगी मातांकडून दुधाचे नमुने घेण्यात आले होते. या अभ्यासात आईच्या दुधामध्ये मायक्रोप्लास्टिक असल्याचे आढळले आहे. ‘ही एक चिंतेची गोष्ट असून त्याचा नवजात बालकांवर मोठा परिणाम होऊ शकतो’, असे या अभ्यासात म्हणण्यात आले आहे. ३४ नमुन्यांपैकी एकूण २६ नमुन्यांत हे मायक्रोप्लास्टिक आढळले. या मायक्रोप्लास्टिकचा रंग, आकार आणि रासायनिक रचना याआधारे वर्गीकरण करण्यात आले आहे.

संशोधकांना मानवी दुधात ‘पॉलिथीन’, ‘पीव्हीसी’, ‘पॉलीप्रोपायलीन’ असे प्लास्टिकचे नमुने आढळले आहेत. प्लास्टिकचे हे सर्व प्रकार पॅकेजिंगसाठी (बांधणीसाठी) वापरले जातात. या अभ्यासाच्या वेळी संशोधक २ मायक्रॉनपेक्षा न्यून आकार असलेल्या प्लास्टिकचा शोध घेऊ शकले नाहीत; मात्र त्यापेक्षा न्यून आकार असलेले प्लास्टिकचे कणही आईच्या दुधात असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

२. मायक्रोप्लास्टिकमुळे फुप्फुसाचाकर्करोग होण्याची शक्यता असणे

समुद्रापासून ते आपण श्वास घेतलेल्या हवेपर्यंत मायक्रोप्लास्टिकचे अस्तित्व आढळते. त्यांचा आकार आणि वजन अत्यंत अल्प असल्यामुळे हवेच्या माध्यमातून ते जवळजवळ प्रत्येक ठिकाणी प्रवास करू शकतात. एवढेच नाही, तर मानवी वस्ती नसलेल्या पर्वतीय आणि ध्रुवीय प्रदेशातही मायक्रोप्लास्टिकचे कण आढळतात. मायक्रोप्लास्टिकचे कण दूषित हवा, अन्न, पाणी यांच्या माध्यमातून मानवी शरिरात प्रवेश करतात. एका अभ्यासानुसार आपण सेवन करत असलेल्या अन्नाच्या माध्यमातून प्रतिवर्षी साधारण ५२ सहस्र मायक्रोप्लास्टिकचे कण आपल्या शरिरात जातात. यामुळे फुप्फुसाचा कर्करोग होऊ शकतो.

३. शरिरात मायक्रोप्लास्टिकचे कण सापडणे म्हणजे हिमनगाचे एक टोक !

याआधीही मानवी शरिरात मायक्रोप्लास्टिकचे कण आढळलेले आहेत. याच वर्षी मार्च मासात ‘एन्व्हायर्नमेंट इंटरनॅशनल’ जर्नलमध्ये एक अभ्यास प्रकाशित करण्यात आला होता. या अभ्यासासाठी एकूण २२ स्वयंसेवकांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. संशोधकांना एकूण नमुन्यांपैकी ८० टक्के नमुन्यांत मायक्रोप्लास्टिकचे कण आढळले होते. नेदरलँड्समधील ‘व्रिजे युनिव्हर्सिटी, ॲमस्टरडॅम’मधील प्राध्यापक डिक वेथाक यांनी मायक्रोप्लास्टिकचे मानवी शरिरावर होणार्‍या परिणामावर अधिक माहिती दिली आहे. ‘शरिरात मायक्रोप्लास्टिकचे कण सापडणे म्हणजे हिमनगाचे एक टोक आहे. नॅनोप्लास्टिकचे कण त्यापेक्षा हानीकारक असू शकतात’, असे डिक वेथाक म्हणाले आहेत.

४. प्रदूषण न्यून करण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करायला हवी !

दुसरीकडे नोटारस्टेफानो यांनी केलेल्या ताज्या अभ्यासात ‘आईच्या दुधात मायक्रोप्लास्टिकचे कण आढळले असले, तरी त्यांनी स्तनपान बंद करू नये’, असा सल्ला दिला आहे. ‘आईच्या दुधामुळे बाळाला होणारा लाभ दुधात मायक्रोप्लास्टिकमुळे होणार्‍या हानीपेक्षा अधिक आहे’, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. ‘स्तनपान कमी करू नये, तर प्रदूषण न्यून करण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करावी’, असेही त्या म्हणाल्या आहेत.

(​साभार​ : दैनिक ‘लोकसत्ता’, १२.१०.२०२२​​)