चर्चमधील कुकृत्ये !

ख्रिस्ती धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी मान्य केले आहे की, नन आणि पाद्री हेही ‘अशा’ प्रकारचे व्हिडिओ पहातात !

‘अश्लील (पॉर्न) व्हिडिओ पहाणे’, ही आज सर्वसामान्य गोष्ट झालेली आहे. ‘त्यात वाईट काहीच नाही’, असे काहींना वाटते. प्रत्यक्षात ‘पॉर्न’ पहाण्याची लागलेली सवय ही सर्वाधिक वाईट असून तिचे दुष्परिणाम कालांतराने संपूर्ण समाजाला भोगावे लागणार आहेत. वयात आलेली मुले अश्लील व्हिडिओ पहातातच; पण धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनीही असा प्रकार करावा, हे संतापजनक आहे. ख्रिस्ती धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी मान्य केले आहे की, नन आणि पाद्री हेही अशा प्रकारचे व्हिडिओ पहातात. अशा लाजिरवाण्या गोष्टीला पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी यांनी विरोध केला नाहीच आणि त्या विरोधात ‘ब्र’ही काढला नाही. पोप यांनी हे विधान चर्चमध्ये भविष्यातील पाद्रयांसाठी आयोजित केलेल्या एका सभेत केले होते. ‘सर्वसामान्य माणूस अशाच पद्धतीने सैतान होत आहे’, असेही त्यांनी सांगितले. ‘भविष्यातील पाद्रयांनी यातून बोध घेऊन चांगल्या गोष्टींचा अंगीकार करायला हवा. धर्माचे जाणकार म्हणवल्या जाणार्‍यांनी किंवा धर्माविषयी हितोपदेश करणार्‍यांनी असे कृत्य केले, तर ख्रिस्ती धर्म लयाला जाऊ शकतो, हे नन आणि पाद्री यांनी लक्षात घ्यायला हवे. अशी कृत्ये करणार्‍यांना त्यांच्या पदावर रहाण्याचा तरी अधिकार आहे का ? जो प्रतिदिन प्रभु येशूला शुद्ध हृदयाने पूजतो, तो अश्लीलतेच्या आहारी जाऊ शकत नाही’, असेही पोप यांनी सांगितले. ‘येशूविषयी आदरभाव नसणारे आणि म्हणूनच अश्लीलतेच्या मार्गाकडे जाणारे नन अन् पाद्री ख्रिस्ती धर्मासाठी कलंकच आहेत’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

तर ख्रिस्ती धर्म लयाला जाऊ शकतो, हे नन आणि पाद्री यांनी लक्षात घ्यायला हवे !

अश्लील व्हिडिओ पाहिले जातात, याचाच अर्थ त्या स्वरूपाच्या विचारांचे बीज त्यांच्या मनात असणारच ! याच लैंगिक जाणिवेतून अनेक पाद्री इतरांवर लैंगिक अत्याचार करतात. केवळ मुलीच नव्हे, तर मुलेही पाद्रयांकडून होणार्‍या लैंगिक शोषणाला बळी पडतात. कित्येक पाद्रयांनी ननवरही बलात्कार केलेले आहेत. अनेक दशके हे असेच चालू आहे. आतातर अशा प्रकारच्या घटनांचे प्रमाण आणखीनच वाढत आहे. असे पाद्री असणे, हे ख्रिस्ती धर्माला लागलेले गालबोटच आहे. यामुळे ख्रिस्ती धर्म हळूहळू लयाला जात आहे. ख्रिस्ती धर्माला लागलेली कीड दूर करण्यासाठी पोप यांनी कठोर पावले उचलायला हवीत. यासाठी कठोर कारवाईची आवश्यकता आहे; पण आतापर्यंतच्या अनेक प्रकरणांमध्ये कारवाईच झालेली नाही, गुन्हाही नोंद करण्यात आलेला नाही आणि ना आरोपी ठरलेल्या संबंधित पाद्रयांना कारावासाची शिक्षा देण्यात आली ! त्यांच्या विरोधातील तक्रारी प्रविष्ट करून घेण्यास पोलिसांनीही अनेकदा टाळाटाळ केली. यामुळे लिंगपिसाट पाद्री सोकावत गेले. आत्मसंयमाच्या अभावी त्यांचे लैंगिक अत्याचार करण्याचे धाडस वाढत गेले. याचीच परिणती वाढत्या लैंगिक अत्याचारांमध्ये झाली. या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर परिषदेचेही आयोजन केले जाते. खरेतर अशा गोष्टीसाठी परिषद घ्यावी लागणे, हेच दुर्दैवी आहे. हे टाळण्यासाठी कठोरातील कठोर शिक्षा हाच वासनांधांच्या कृत्यांना पायबंद घालण्याचा उत्तम उपाय आहे.
चर्चवर बंदी हवी !

लैंगिक शोषणाची ही कीड विदेशातही मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. ‘फ्रान्समध्ये वर्ष १९५० पासून जवळपास २ लाख १६ सहस्र लहान मुले कॅथॉलिक पाद्रयांच्या लैंगिक अत्याचारांना बळी पडली आहेत’, अशी माहिती वर्ष २०२१ मध्ये उघड झाली होती. जर्मनीतील १ सहस्र ६७० पाद्रयांकडून वर्ष १९४६ ते २०१४ या कालावधीत ३ सहस्र ६७७ अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. थोडक्यात काय, तर ‘चर्च म्हणजे उपासनेचे केंद्र किंवा प्रार्थनास्थळ नव्हे, तर लैंगिक अत्याचार करणारे एक ठिकाणच झाले आहे’, असे म्हणावे लागेल. अत्याचारी आणि गुन्हेगारी पाद्रयांना अनेकदा पाठीशी घातले गेल्यानेच लैंगिक शोषणाच्या घटना वाढत गेल्या. अशा प्रकारे ख्रिस्त्यांच्या प्रार्थनास्थळाचे पितळ समाजासमोर उघडे पडत चालले आहे. लैंगिकतेच्या विषवल्लीमुळे ख्रिस्ती धर्माचा पाया डळमळीत होत आहे. चर्चमधून प्रेमभाव आणि शांती यांची नव्हे, तर लैंगिक अत्याचारांचीच शिकवण दिली जाते कि काय, असा प्रश्न उपस्थित होतो. शांती, प्रेम आणि सहिष्णुता यांच्या गप्पा मारणार्‍या पाद्रयांना हे शोभते तरी का ? यात केवळ पाद्रीच नव्हे, तर बिशप किंवा कार्डिनल यांचाही समावेश असतो. लैंगिक अत्याचारांच्या वाढत्या विकृतीला आळा घालण्यासाठी प्रथम चर्चमध्ये नेमके कोणते प्रकार चालतात ? यांचा शोध घेणे क्रमप्राप्त ठरेल. चर्च हे लैंगिक अत्याचाराचे केंद्र तर आहेच; पण तेथून धर्मांतराचे बीज रोवले जात आहे, हेही वास्तव नाकारून चालणार नाही. त्यामुळे चर्चची दिवसेंदिवस उघड होणारी काळी बाजू पहाता त्यांच्यावर कुणी बंदीची मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !

ख्रिस्तीधार्जिणेपणाचा परिणाम !

हिंदु संतांवर जेव्हा लैंगिक अत्याचारांचे खोटे आरोप होतात, तेव्हा सर्वत्रची प्रसारमाध्यमे सगळे बळ एकवटून हिंदु धर्माला विरोध करण्यासाठी सिद्ध असतात; पण नन किंवा पाद्री अश्लील व्हिडिओ पहातात, ही घटना किंवा वृत्त किती माध्यमांनी जगासमोर आणले, हे शोधल्यास त्यांची संख्या हाताच्या बोटांवर मोजता येईल, इतकीच असेल ! अशी माध्यमे म्हणजे जणू ख्रिस्त्यांची बटीकच होत. हिंदु धर्माला ‘धर्मद्वेषा’च्या चष्म्यातून पहाणारे ख्रिस्ती धर्मातील अपप्रकारांविषयी काहीच का बोलत नाहीत ? यातूनच त्यांचा ख्रिस्तीधार्जिणेपणा उघड होतो, हेच खरे ! हिंदु पुजार्‍यांच्या संदर्भात प्रत्येक स्तरावर विरोधात्मक भूमिका घेतली जाते; पण पाद्रयांची कोणतीही कृती ही समर्थनीय ठरवली जाते. ही धर्मद्वेषी मानसिकताच अशा घटनांचे मूळ आहे. पाद्रयांच्या कुकृत्यांविषयी मूग गिळून गप्प बसणार्‍या किंवा त्यांचे छुपे समर्थन करणार्‍यांमुळेच अशा घटना न्यून होत नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे. चर्चमधील या वासनांध आणि सैतानी वृत्तीला रोखणे, हीच काळाची आवश्यकता आहे.

पाद्रयांकडून केल्या जाणार्‍या लैंगिक अत्याचारांविषयी न बोलणारी माध्यमे आणि निधर्मीवादी हे ख्रिस्त्यांची बटीक !