पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या जीवनावरील पुस्तकाच्या प्रकाशनाचा जाहीर कार्यक्रम रहित !

  • हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधाचा परिणाम !

  • विरोधानंतर लेखकाच्या घरात करण्यात आले प्रकाशन !

  • हिंदु जनजागृती समिती आणि श्रीराम सेना यांच्या निवेदनानंतर सरकारचा निर्णय

इम्रानखान यांच्या जीवनावरील पुस्तकाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रहित करण्यासाठी पोलीस निरीक्षक मंजुनाथ यांना निवेदन देतांना उजवीकडून  हिंदु जनजागृती समितीचे श्री. मोहन गौडा आणि श्रीराम सेनेचे कार्यकर्ते

बेंगळुरू – हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या विरोधानंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या जीवनावरील पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम कर्नाटकमधील भाजप सरकारने रहित केला. या पुस्तकाचे प्रकाशन नंतर पुस्तकाच्या लेखकाच्या घरामध्ये काही जणांच्या उपस्थितीत करण्यात आले.

‘प्रमथ प्रकाशन’च्या वतीने २७ ऑक्टोबर २०२२ ला सायंकाळी ५.३० वाजता येथील मल्लतळ्ळी कलाग्राम येथे इम्रान खान यांच्या जीवनावरील पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुधाकर एस्.बी. नावाच्या लेखकाने हे पुस्तक लिहिले असून त्याचे प्रकाशन कर्नाटक उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एच्.एन्. नागमोहन दास यांच्या हस्ते करण्यात येणार होते. याची माहिती मिळताच हिंदु जनजागृती समिती आणि श्रीराम सेना यांनी कन्नड अन् संस्कृत विभागाचे मंत्री सुनील कुमार, तसेच पोलीस अधिकारी मंजुनाथ यांना निवेदन देऊन हा कार्यक्रम रहित करण्याची मागणी केली. या वेळी हिंदुत्वनिष्ठ नेते श्री. एम्.एल्. शिवकुमार, श्रीराम सेनेचे कार्यकर्ते, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. मोहन गौडा आदी उपस्थित होते.

शत्रूराष्ट्राच्या पंतप्रधानाचे उदात्तीकरण करणे, हे देशद्रोही कृत्य ! – मोहन गौडा, हिंदु जनजागृती समिती

या प्रकरणी श्री. मोहन गौडा म्हणाले, ‘‘पाकिस्तान भारतातील आतंकवादाला साहाय्य करत आहे. इम्रान खान स्वतः काश्मीरमधील आतंकवादी कारवायांना प्रोत्साहन देत आहेत. इम्रान खान पंतप्रधान असतांना काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणात ४० शूर भारतीय सैनिकांना वीरमरण आले होते. शत्रूराष्ट्राच्या पंतप्रधानाचे उदात्तीकरण करणे, हे देशद्रोही कृत्य आहे. त्यामुळे या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला अनुमती देण्यात येऊ नये. या पुस्तकावर बंदी घालण्यात यावी आणि या कार्यक्रमाच्या आयोजकांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा, अशा मागगण्या आम्ही राज्य सरकारकडे केल्या. त्यांस प्रतिसाद देत राज्य सरकारने हा कार्यक्रम रहित केला.’’

संपादकीय भूमिका

असा कार्यक्रम आयोजित करणार्‍यांवर सरकारने देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे !