पोलाद क्षेत्र ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला गती देईल ! – पंतप्रधान

सुरत (गुजरात) – भारताच्या संरक्षण आणि अभियांत्रिकी यांच्या प्रगतीला आणखी गती देण्यासाठी भारत सरकार पोलाद क्षेत्राला नवीन उंचीवर नेण्यासाठी वचनबद्ध आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील हजिरा येथे पोलाद क्षेत्रातील प्रमुख ‘आर्सेलर मित्तल-निप्पॉन स्टील इंडिया’च्या विस्तार प्रकल्पाच्या भूमीपूजनप्रसंगी ते बोलत होते. भारताचे पोलाद क्षेत्र ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला गती देईल, असेही पंतप्रधान पुढे म्हणाले.

६० सहस्र कोटींहून अधिक गुंतवणुकीच्या या विस्तार प्रकल्पामध्ये गुजरात आणि देशातील तरुणांसाठी रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील. या विस्तारानंतर हजिरा स्टील प्रकल्पामधील ‘क्रूड (कच्चे) स्टील’ची उत्पादन क्षमता ९ दशलक्ष टनांवरून १५ दशलक्ष टनांपर्यंत वाढेल.

वर्ष २०४७ पर्यंत विकसित भारताकडे वाटचाल करण्याच्या उद्दिष्टांमध्ये पोलाद उद्योगाची वाढती भूमिका अधोरेखित करतांना मोदी म्हणाले की, सक्षम पोलाद क्षेत्र देशाला कणखर पायाभूत सुविधा क्षेत्राकडे नेत आहे. तसेच रस्ते, रेल्वे, विमानतळ, बंदरे, बांधकाम, ऑटोमोटिव्ह, अभियांत्रिकी उत्पादने यांमध्ये पोलाद क्षेत्राचे मोठे योगदान आहे. भारताकडून जगाच्या अपेक्षांचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, भारत जगातील सर्वांत मोठे उत्पादन केंद्र बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. या क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक धोरणात्मक वातावरण सिद्ध करण्यात सरकार सक्रीयरित्या कार्यरत आहे.

(भारतीय बनावटीच्या वस्तू बनवून भारताला स्वयंपूर्ण करण्यासाठी केंद्रशासनाने बनवलेल्या योजनेला मेक इन इंडिया म्हणतात.)