मतदारसूचीतून यादव आणि मुसलमान यांची नावे काढून टाकण्यात आल्याचे पुरावे द्या !

अखिलेश यादव यांच्या निवडणूक आयोगावरील गंभीर आरोपानंतर आयोगाची त्यांना नोटीस !

नवी देहली – निवडणूक आयोगाने समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना नोटीस बजावली आहे. यावर त्यांना १० नोव्हेंबरपर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये यादव यांनी निवडणूक आयोगावर टीका करतांना आरोप केला होता की, भाजपच्या सांगण्यावरून आयोगाने उत्तरप्रदेशातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी २० सहस्र यादव समाज आणि मुसलमान यांची नावे मतदारसूचीतून हटवली आहेत. यामुळेच निवडणुकीत आमचा पराभव झाला. याची चौकशी झाली पाहिजे.

निवडणूक आयोगाने पाठवलेल्या नोटिसीमध्ये म्हटले आहे की, कायदा आम्हाला जात आणि धर्म यांच्यावर आधारित मतदारसूची बनवण्याचा अधिकार देत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे आरोप करणे गंभीर गोष्ट आहे. जर इतक्या मोठ्या संख्येने नावे काढून टाकण्यात आली असतील, तर त्याचा पुरावा देण्यात यावा. कोणत्या मतदारसंघात कुठल्या भागातील नावे हटवण्यात आली, त्याची माहिती द्यावी. याविषयी कोणत्या मतदाराने तक्रार केली असेल, तर त्याचीही माहिती द्यावी. तसेच मतदारांच्या शिष्टमंडळाने निवडणूक अधिकार्‍यांकडे तक्रार केली असेल, तर त्याचीही माहिती देण्यात यावी.

एखाद्या मतदारसंघातून २० सहस्र मतदारांची नावे हटवण्यात आली, अशी कोणतीही तक्रार आमच्याकडे आलेली नाही. केवळ अलीगंज विधानसभा मतदारसंघातील समाजवादी पक्षाच्या उमेदवाराकडून १० सहस्र अल्पसंख्यांक आणि मागासवर्गीय मतदारांची नावे हटवण्यात आल्याची तक्रार मिळाली होती अन् त्याची चौकशी करण्यात आल्यावर ती तक्रार खोटी असल्याचे समोर आले होते, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.