राज्यातील रेल्वेस्थानकांवरील कोट्यवधी रुपयांची शेकडो ‘वॉटर वेंडिंग मशिन’ बंद !

  • संपूर्ण देशात हीच स्थिती असण्याची दाट शक्यता !

  • ‘वॉटर वेंडिंग मशिन’ म्हणजे पाणी विक्री करणारी यंत्रे !

मुंबई, २७ ऑक्टोबर (वार्ता.) – महाराष्ट्रासह देशभरातील विविध रेल्वेस्थानकांवर नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी बसवण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांची शेकडो ‘वॉटर वेंडिंग मशिन’ (पाणी विक्री करणारी यंत्रे) बंद पडली आहेत. त्यामुळे या बंद पडलेल्या यंत्रांची विक्री करणे आणि नवीन यंत्रांसाठी निविदा मागवणे, ही रेल्वे प्रशासनासाठी डोकेदुखी झाली आहे.

१. कोरोना महामारीच्या काळात बंद असलेल्या देशभरातील विविध रेल्वेस्थानकांवरील ही शेकडो यंत्रे मागील ३ वर्षांपासून बंद आहेत. यापूर्वी ‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आय्.आर्.सी.टी.सी.)’द्वारे ही यंत्रे चालवली जात होती; परंतु त्यांच्यासाठी होणारा व्यय परवडत नसल्यामुळे ही सर्व यंत्रे सध्या रेल्वे प्रशासनाकडे सुपुर्द करण्यात आली आहेत.

२. सद्यःस्थितीत बंद पडलेल्या यंत्रांची विक्री करण्याचे दायित्व मात्र आय्.आर्.सी.टी.सी.कडे आहे. या यंत्रांची विक्री झाल्यानंतरच त्या जागी नवीन यंत्र खरेदी करणे आणि चालवणे यांसाठी निविदा काढल्या जाणार आहेत; परंतु अद्याप बहुतांश यंत्रांची विक्रीच झालेली नाही. निविदा स्वीकारणार्‍या आस्थापनांना सद्यःस्थितीत असलेली यंत्रे दुरुस्त करून वापरण्याचा पर्यायही देण्यात आला आहे.

३. मागील काही मासांपासून रेल्वेच्या त्या त्या विभागाकडून आपल्या विभागातील ‘वॉटर वेंडिंग मशिन’ चालवण्यासाठी निविदा काढण्यात येत आहेत. ‘आतापर्यंत ५ वेळा निविदा काढूनही त्यांना म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नाही’, अशी माहिती एका रेल्वे अधिकार्‍यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली.

मुंबईत मध्य आणि हार्बर मार्गावरील ८२ पैकी केवळ ९ यंत्रे चालू !

मुंबईतील मध्य आणि हार्बर मार्गावरील एकूण १०८ रेल्वेस्थानकांवर एकूण ८२ ‘वॉटर वेंडिंग मशिन’ आहेत; मात्र सध्या त्यांतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथील ५, तर कल्याण रेल्वेस्थानकांवरील ४ यंत्रे चालू आहेत. महाराष्ट्रासह देशभरातील ‘वॉटर वेंडिंग मशिन’ची अशीच स्थिती आहे, असे रेल्वे अधिकार्‍यांनी सांगितले.

रेल्वेप्रशासनाने धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक !

ही यंत्रे स्वयंचलित असली, तरी काही ठिकाणी रिकाम्या बाटल्यांमध्ये पाणी देणे आणि पैसे घेणे यांसाठी दिवसभर एका व्यक्तीची नियुक्ती करावी लागते. रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेस्थानकावरील केवळ जागा देण्यात येणार आहे. यंत्रे खरेदी करणे, त्यासाठी व्यक्ती नियुक्त करणे, वीजदेयकाची रक्कम भरणे आदी सर्व निविदा स्वीकारणार्‍या आस्थापनाला करावे लागणार आहे. मुंबईमध्ये गर्दी असल्यामुळे येथे हे परवडणारे आहे. गर्दी नसलेल्या रेल्वेस्थानकांवर मात्र आर्थिकदृष्ट्या ही यंत्रणा परवडत नाही. नियुक्त केलेल्या व्यक्तीला प्रतिमास १५ सहस्र रुपये वेतन देण्याची निविदेत अट आहे. अनेक रेल्वेस्थानकांवर नवीन स्वयंचलित जिने उभारण्यात आल्यामुळे पूर्वीच्या यंत्रांच्या जागा दुलर्क्षित झाल्या आहेत. या सर्व गोष्टींमुळे निविदांना प्रतिसाद अल्प आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या सर्व गोष्टींचा विचार करून निविदा प्रक्रियेविषयी धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे, असे एका रेल्वे अधिकार्‍यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

  • जर एखाद्या आस्थापनाकडून घेतलेली बहुसंख्य यंत्रे बंद पडली, तर त्या आस्थापनाला त्यासाठी उत्तरदायी ठरवायला हवे कि यामागे अन्य काही कारण आहे ? ते पुढे यायला हवे !
  • बहुसंख्य फलाटांवरील यंत्रे बंद पडली आहेत, याचा अर्थ ‘ही यंत्रे बंद पडली आहेत कि बंद पाडली गेली आहेत ?’, याविषयीचा संशय बळावतो. रेल्वेफलाटावरील पाण्याच्या बाटल्या विकणार्‍या दुकानदारांचा यामागे हात आहे का ? याचाही शोध प्रशासनाने घ्यायला हवा !