सप्तर्षींच्या आज्ञेनुसार श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची चालू असलेली अष्टविनायक यात्रा !

‘सप्तर्षी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सप्तर्षींनी सांगितले आहे, ‘वर्ष २०२२ च्या विजयादशमीनंतर श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी महाराष्ट्रातील अष्टविनायक यांचे दर्शन घ्यावे. या दौर्‍याच्या वेळी गणपतीशी संबंधित अन्य काही प्रमुख गणपति मंदिरांतही जाऊन मूर्तीचे दर्शन घ्यावे आणि ‘साधकांची प्राणशक्ती वाढावी, तसेच हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, यासाठी गणपतीला प्रार्थना करावी.’

सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी १०.१०.२०२२ पासून महाराष्ट्रातील गणपति मंदिरांत दर्शनाला जाण्यास आरंभ केला आहे. त्यांनी १५.१०.२०२२ या दिवशी लेण्याद्री येथील गिरिजात्मजाचे दर्शन घेतले.

‘लेण्याद्री’ येथील ‘गिरिजात्मज’ गणपति

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘गिरिजात्मज’ गणपतीचे घेतले दर्शन !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

१. ‘आम्ही १५.१०.२०२२ या दिवशी लेण्याद्री येथे गेलो. आदल्या दिवसापर्यंत तेथे पाऊस पडत होता. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे लेण्याद्री येथे जाण्याचे ठरले. त्या वेळी पाऊस पूर्णपणे थांबला होता आणि ऊनही अधिक नव्हते.

पुजार्‍यांनी हिंदु राष्ट्रासाठी प्रार्थना केली आणि प्रसादाचा नारळ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना दिला.
गिरिजात्मज गणपतीच्या लेण्याकडे दर्शनाला डोलीतून जातांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

२. गिरिजात्मज गणपतीच्या लेण्याकडे जाण्यासाठी शेकडो पायर्‍या चढाव्या लागतात. श्री गुरुकृपेने श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना पायर्‍या चढाव्या न लागता त्यांच्यासाठी डोलीची सोय झाली.

श्री. विनायक शानभाग

३. गिरिजात्मज गणपतीला गेल्यावर तेथील पुजार्‍यांनी हिंदु राष्ट्रासाठी प्रार्थना केली आणि प्रसादाचा नारळ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना दिला.

४. लेण्याद्रीला पायर्‍या चढतांना पुष्कळ माकडे येऊन त्रास देतात; मात्र श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ आणि आम्ही सर्व साधक वर चढत असतांना माकडांनी कुठलाही त्रास दिला नाही.’

– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), पुणे, महाराष्ट्र. (१८.१०.२०२२)


‘लेण्याद्री’ येथील ‘गिरिजात्मज’ गणपतीचा इतिहास

अष्टविनायक गणपती गिरिजात्मज, लेण्याद्री

१. स्थान

‘लेण्याद्री हे स्थान पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील कुकडी नदीच्या तिरावर आहे. अष्टविनायकांपैकी उंच पर्वतावर स्थित आणि लेण्यांच्या सान्निध्यात असलेला लेण्याद्रीचा ‘गिरिजात्मज’ हा एकमेव गणेश आहे. या डोंगराला ‘लेण्याद्री पर्वत’ असेही म्हणतात. पर्वताच्या पायथ्यापासून मंदिरात पोचण्यासाठी २८५ पायर्‍या आहेत.

२. देवाधिदेव महादेव त्र्यंबकेश्वर या क्षेत्री तप करत असतांना देवी पार्वतीने त्यांना विचारलेला प्रश्न आणि महादेवाने पार्वतीला दिलेल्या उत्तरातून आद्य देव अन् ‘ॐ’ या एकाक्षरी प्रभावी मंत्राची वर्णिलेली महती !

देवाधिदेव महादेव त्र्यंबकेश्वर क्षेत्री तप करत असतांना देवी पार्वतीने त्यांना विचारले, ‘आपण स्वतः देवाधिदेव असतांना कुठल्या देवाची तपश्चर्या करत आहात ?’ तेव्हा शंकराने सांगितले, ‘मी जरी देवांचा देव महादेव असलो, तरी माझ्यापेक्षाही एक सर्वश्रेष्ठ उपास्य आणि प्रेरक देव आहे, जो माझ्या समवेत भगवान ब्रह्मदेव, विष्णु, शक्ती, सूर्य-चंद्र आणि वरुण या सर्वांनाच प्रेरणा देणारा देव आहे. या देवाने सृष्टी निर्माणाचे कार्य ब्रह्मदेवावर, सर्वांच्या पालनपोषणाचे कार्य श्रीविष्णूवर, तर माझ्यावर (महादेवावर) सृष्टीतील सजिवांच्या लयाचे कार्य सोपवले आहे. अष्टसिद्धि, चौदा विद्या आणि चौसष्ट कला यांचा तो अधिपती असून तो सर्व गणांचा पती अन् आद्य देव आहे. त्याच्या तपामध्ये मोठे सामर्थ्य आहे. या देवाधिदेवाचे नाव ॐ कार असून ‘ॐ’ या एकाक्षरी प्रभावी मंत्रात तेजस्वी सामर्थ्य आहे. मी प्रतिदिन त्याचे तप करतो. हे पार्वतीदेवी, ‘तुम्हीसुद्धा पुण्यसंचयासाठी एकांत स्थळी ॐकाराची तपश्चर्या करणे आवश्यक आहे.’

३. पार्वतीने बालकाची मातीची मूर्ती करून त्याच्यासमोर तपश्चर्या करणे आणि एका तपानंतर त्या मूर्तीतून एक सोंड अन् चतुर्भुज बालक निर्माण होणे

भगवान शंकराने सांगितलेल्या तप माहात्म्यामुळे पार्वतीने जीर्णपूर (सध्याचे जुन्नर) गावाजवळील लेखन पर्वतामागील एका सुंदर लेण्यात बसून ‘ॐ’ या महामंत्राचे अनुष्ठान चालू केले. हे अनुष्ठान आणि उपासना करतांना मन एकाग्र होण्यासाठी पार्वतीने आपल्यासमोर एका बालकाची मातीची मूर्ती करून ठेवली. पार्वतीच्या तपश्चर्येची एक तपपूर्ती झाल्यावर त्या मृत्तिकेच्या (मातीच्या) बाल मूर्तीतून एक सोंड आणि चतुर्भुज असलेला बालक निर्माण झाला. हा बाल गणेश सामर्थ्यशाली होता आणि भक्तांची संकटे दूर करण्यासाठी त्याने जन्म घेतला होता. त्या दिवशी भाद्रपद शुक्ल चतुर्थी होती; म्हणूनच नंतर सृष्टीमध्ये याच दिवशी घरोघरी मृत्तिकेची गणेशमूर्ती आणून तिची प्रतिष्ठापना करून उत्सव साजरा केला जाऊ लागला.

४. गणपतीला ‘गिरिजात्मज’ असे नाव का पडले ?

‘गिरी’ म्हणजे ‘पर्वत’, म्हणजे हिमालय ! या गिरिराजाची पार्वती ही कन्या, म्हणजेच ‘गिरिजा’ होय. पार्वतीरूपी गिरिजेच्या आत्म्यापासून निर्माण झालेला देव; म्हणून बाल ॐ काराचे नाव ‘गिरिजात्मज’ असे ठेवले. येथील लेण्याच्या मागच्या बाजूस एक गुहा होती. त्या गुहेत बसून पार्वतीमातेने तप केल्याने तेथे बाल गणेश प्रकटला. पार्वतीने तेथे गणेशाची स्थापना केली; पण लेण्याच्या बाजूला बाल गणेशाची पाठ आली होती. सध्या या गुहेत जाणे शक्य होत नाही. त्यामुळे लेण्यामध्ये श्री गिरिजात्मजाचा पृष्ठभाग असून त्याचीच पूजा म्हणजेच पाठपूजाच करण्यात येते. मुखपूजा करता येत नाही. असा हा ‘लेखनाद्री पर्वत, म्हणजेच श्री गणेशाचे रूप आहे’, असे पुराणांमध्ये सांगितलेले आहे; म्हणून गणेशभक्त श्रद्धेने या पर्वतालाही नमस्कार करतात.

५. डोंगरात लेण्याप्रमाणेच खोदलेले मंदिर आणि मस्तक डावीकडे झुकलेली  पहाडात कोरलेली गिरिजात्मज गणेशाची मूर्ती !

पर्वतात खोदलेले मंदिर लेण्याप्रमाणेच वाटते. मंदिराचे मुख्य द्वार दक्षिणाभिमुख असले, तरी मूर्ती उत्तराभिमुख आहे. ही मूर्ती पहाडात कोरलेली असून तिचे मस्तक डावीकडे झुकलेले दिसते. या मूर्तीला शेंदूर लावलेला आहे. गिरिजात्मजाच्या बाजूला हनुमान, गणेश आणि शिव यांच्या मूर्ती आहेत. ‘श्री गणेशमूर्तीच्या भाळी आणि नाभीत अस्सल हिरे जडवलेले आहेत’, असे म्हणतात.’

(संदर्भ ग्रंथ : अष्टविनायक यात्रा, लेखक : डॉ. बी.पी. वांगीकर)

अष्टविनायकांना प्रार्थना !

स्वस्ति श्रीगणनायको गजमुखो मोरेश्वरः सिद्धिदःबल्लाळस्तु विनायकस्त्वथ मढे चिन्तामणिस्थेवरे ।
लेण्याद्रौ गिरिजात्मजः सुवरदो विघ्नेश्वरश्चोझरेग्रामे राञ्जणसंस्थितो गणपतिः कुर्यात् सदा मङ्गलम् ।।

अर्थ : गणांचा स्वामी असलेल्या श्री गजाननाचे, तसेच मोरगावचा मोरेश्वर, सिद्धटेक येथील (सर्व सिद्धी देणारा) सिद्धेश्वर यांचे जो स्मरण करतो, त्याचे कल्याण होवो. पाली येथे ‘बल्लाळेश्वर’ या नावाने रहाणारा, महड येथील ‘वरदविनायक’, थेऊर येथील ‘चिन्तामणि’, लेण्याद्रीचा ‘गिरिजात्मज’, उत्तम वर देणारा ओझरचा ‘विघ्नेश्वर’, रांजणगावचा ‘महागणपति’ सर्वांवर सदैव कृपा करो !