आश्विन शुक्ल चतुर्थी (५.१०.२०१६) या दिवशी विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पाने अन् कृपाशीर्वादाने भाववृद्धी सत्संगांना आरंभ झाला. (२९.९.२०२२ या दिवशी या सत्संगांना ६ वर्षे पूर्ण झाली.) सनातनच्या साधकांमधील आणि सनातनशी जोडलेल्या प्रत्येक जिवाच्या अंतरातील भक्ती अन् भाव यांची जागृती होण्यासाठी आणि प्रत्येक जिवामध्ये वास करणार्या ईश्वराला अनुभवण्यासाठी, जिवाला त्याच्या मूळ रूपाची ओळख होण्यासाठी या सत्संगांना आरंभ झाला. सर्व साधकांमध्ये भाववृद्धी करणे, एवढाच या भावसत्संगाचा उद्देश नसून ‘साधक आणि सर्व जीव यांच्यासहित संपूर्ण पृथ्वीची शुद्धी करून या भूमातेला पुन्हा एकदा रज-तमातून मुक्त करून भूतलावर दैवी वातावरणाची निर्मिती करणे’, हा या सत्संगांचा उद्देश आहे. ‘सर्व जिवांना सुख-दुःख यांच्या पलीकडे असलेल्या चिरंतन आनंदाशी एकरूप करणे आणि मन-बुद्धीच्या पलीकडे असलेल्या ईश्वरी शक्तीला अनुभवणे, म्हणजेच पुन्हा एकदा सत्ययुग आणणे’, हेही या सत्संगांमागील उद्दिष्ट आहे. या भाववृद्धी सत्संगाचा लाभ करून घेतल्यामुळे देश-विदेशांतील साधकांमध्ये आंतरिक परिवर्तन होत आहे. सत्संगात झालेले सर्व विषय, म्हणजे साक्षात् ब्रह्मदेवाचे ज्ञानच आहे. भाववृद्धी सत्संगाच्या माध्यमातून साधक भगवंताचा अखंड कृपावर्षावही अनुभवत आहेत. ती कृपा साधकांनी सत्संगात सांगितलेल्या प्रयत्नांच्या माध्यमातून कशी अनुभवली ? याविषयी त्यांनी भावसत्संगामध्ये कृतज्ञतास्वरूपात अर्पण केलेले शब्दरूपी मनोगत येथे दिले आहे.
भाग २.
भाग १. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/621453.html
२० ऑक्टोबर २०२२ या दिवशी आपण काही साधकांची मनोगते पाहिली. आज अन्य साधकांची मनोगते पाहूया.
६. एक साधिका, संभाजीनगर
६ अ. सद्गुण पहायला शिकल्यावर झालेला लाभ !
६ अ १. आरंभी भाववृद्धी सत्संग केवळ ऐकत असणे, साधनेला घरातून विरोध होऊ लागल्यामुळे नकारात्मक विचारांत वाढ होणे : आरंभी भावसत्संग चालू झाल्यावर मी तो केवळ ऐकत होते. हळूहळू माझ्या घरातील विरोध वाढला. प्रत्येक वेळी सत्संग ऐकण्यासाठी काहीतरी वेगळे कारण सांगून बाहेर जावे लागत होते. त्यामुळे मला नैराश्य येऊन माझ्या मनातील नकारात्मक विचार वाढले होते. त्या वेळी माझ्या मनात ‘आता मला साधना आणि सेवा करणे शक्य नाही’, असा विचार येत होता.
६ अ २. यजमान साधनेला विरोध करत असूनही त्यांच्यामध्ये सद्गुण पहाता येणे आणि स्वतःला पालटण्याचा प्रयत्न केल्यावर यजमान साधनेसाठी साहाय्य करत असल्याचे अनुभवता येणे : नंतर भावसत्संगात ऐकले की, ‘समोरच्या व्यक्तीमध्ये सद्गुण पहायचे आणि स्वतःमधील स्वभावदोष पहायचे.’ तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘देव आणि साधना यांना विरोध करणार्या यजमानांमध्ये सद्गुण कसे पहायचे ?’ नंतर मी विचार केला, ‘आता ईश्वराचा संकल्प झाला आहे, तर आपण प्रयत्न करूया.’ प्रयत्न केल्यावर हळूहळू मला त्यांच्यातील सद्गुण दिसायला लागले. त्यामुळे माझ्या मनातील नकारात्मकता दूर झाली. हे भाववृद्धी सत्संगामुळेच शक्य झाले. ईश्वराच्या संकल्पाचा लाभ मला अनुभवता आला.’
७. सौ. सुमा पुथलत, केरळ
७ अ. स्वतःमधील बहिर्मुखतेमुळे इतरांच्या चुका पहाणे, स्वतःच्या चुका न स्वीकारणे, नामजप, प्रार्थना आणि भावाचे प्रयत्न केल्यामुळे चुका स्वीकारणे शक्य होणे : ‘कुणी चुका सांगितल्यास ‘मला त्या माझ्या चुका नाहीत’, असे वाटायचे. त्यामुळे मला त्या स्वीकारता येत नसत. ‘स्वतःच्या चुकांकडे लक्ष न देणे, दुसर्यांच्या चुका बघणे आणि प्रतिक्रिया व्यक्त करणे’, असे स्वभावदोष आणि अहं माझ्यात आहेत. त्यामुळे अधून-मधून माझ्यावर अनिष्ट शक्तीचे आवरणही वाढते. आता मी भावसत्संगात सांगितलेले प्रयत्न वाढवले आहेत. नामजप, प्रार्थना आणि भावजागृतीचे प्रयत्न केल्यामुळे मला चुका स्वीकारता येऊ लागल्या आहेत आणि आता माझ्या मनातील नकारात्मक विचार अल्प होत आहेत.
७ आ. स्वःमध्ये श्रद्धा अल्प असल्याचे लक्षात येणे : आधी मला वाटायचे, ‘माझ्यात ईश्वर आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्याप्रती पुष्कळ श्रद्धा आहे’; पण भावसत्संगात ‘श्रद्धा कशी ओळखायची ?’ याविषयी सांगितल्यावर माझ्या लक्षात आले, ‘कोणतीही घटना घडल्यावर मी डळमळते. याचा अर्थ माझ्यात श्रद्धा अल्प आहे.’
८. श्री. अपूर्व ढगे, नागेशी, गोवा.
८ अ. नोकरी सोडल्यावर ‘आई-बाबांची आणि पैसे पुरतील का ?’, अशी काळजी वाटणे, स्वयंसूचना घेतल्यावर काळजीचे विचार निघून जाणे : ‘पूर्वी मला आई-बाबांची पुष्कळ चिंता वाटायची. मी नोकरी सोडल्यानंतर ‘माझ्याकडे असलेले पैसे मला पुरतील का ?’, असा विचार सतत माझ्या मनात यायचा आणि तो बरेच दिवस मनात रहायचा. त्यानंतर चिंतेचा विचार मनात आल्यावर मनातल्या मनात तात्कालिक सूचना द्यायचो, ‘देवच आई-बाबांची काळजी घेणार आहे.’ त्यानंतर माझ्या मनातील चिंतेची तीव्रता न्यून झाली. आधी चिंतेचे विचार आल्यावर ते दिवसभर मनात रहायचे. स्वयंसूचना घेतल्यावर ते विचार २ मिनिटे यायचे आणि निघून जायचे. आता चिंता पूर्ण निघूनच गेली आहे.
८ आ. सेवा आणि प्रत्येक कृती करतांना भाव ठेवून करू लागल्यावर देवावरील श्रद्धा वाढणे : पूर्वी कुठलीही सेवा किंवा कृती करतांना मी भाव ठेवायचो नाही. त्यामुळे माझ्याकडून पुष्कळ चुका व्हायच्या. नंतर भाववृद्धी सत्संगात सांगितल्याप्रमाणे हळूहळू भाव ठेवू लागलो. ‘सर्वकाही देवच करणार आहे’, असा विचार करून मी सेवा करायला लागलो. त्यानंतर मला आनंद मिळू लागला. ‘आता देवाविना काहीच नाही, जीवनात ज्या काही गोष्टी घडतात, त्या देवाविना शक्य नाही’, असा विचार येऊन माझी देवावरील श्रद्धा वाढली.
– कु. वैष्णवी वेसणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) आणि कु. योगिता पालन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (१०.४.२०१९)
भाग ३. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/630330.html
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |