‘भाववृद्धी सत्संगामुळे साधक भगवंताचा कृपावर्षाव कसा अनुभवत आहेत’, या संदर्भात त्यांनी भावसत्संगामध्ये कृतज्ञतास्वरूपात अर्पण केलेले शब्दरूपी मनोगत येथे दिले आहे. १० नोव्हेंबर २०२२ या दिवशी आपण काही साधकांचे मनोगत पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.
भाग ३.
भाग २. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/623012.html
१०. कु. स्वाती शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
१० अ. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेतील आनंद मिळणे, श्रद्धा आणि भाव वाढणे : ‘भावसत्संगात घेतलेल्या एका विषयात ‘आजपर्यंत गुरुदेवांनी आपल्यासाठी काय काय केले ?’, असे चिंतन करायला सांगितले होते. चिंतन केल्यावर माझ्या लक्षात आले, ‘भगवंताने माझ्यात एवढे परिवर्तन केले आहे आणि इथून पुढेही तोच माझ्यात परिवर्तन करणार आहे.’ त्यामुळे माझी भगवंतावर श्रद्धा दृढ होऊन माझे साधनेचे प्रयत्न वाढले. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेविषयी भाव आणि श्रद्धा वाढली अन् खर्या अर्थाने मला स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेतील आनंद मिळायला लागला.
१० आ. कुटुंबियांविषयी अपेक्षा उणावून त्यांच्याशी जुळवून घेता घेणे : माझ्या कुटुंबियांकडून तीव्र अपेक्षा असल्याने माझे त्यांच्याशी पटायचे नाही. तेव्हा मला आतून वाटायचे, ‘घरी मला देवाला अपेक्षित असे वागता येत नाही.’ सत्संगात कौटुंबिक स्तरावर जे प्रयत्न करायला सांगितले होते, ते असे की, ‘प्रत्येकाचे प्रारब्ध वेगवेगळे असते. कुटुंबियांविषयी आपल्या पुष्कळ अपेक्षा असतात. त्यामुळे आपण इतरांना समजून घेऊ शकत नाही.’ हे सूत्र लक्षात घेऊन प्रयत्न केल्यामुळे मला कुटुंबियांशी जुळवून घेता येऊ लागले. मी त्यांची क्षमायाचना केली. त्यामुळे कुटुंबियांशी ‘साधक’ म्हणून वागण्याचे प्रयत्न करता येऊ लागले.
१० इ. भाववृद्धी सत्संगात सकारात्मक विचार करायला सांगितल्यावर तसे प्रयत्न होऊन लागणे : पूर्वी मी प्रत्येक प्रसंगात नकारात्मक विचार करायचे, उदा. ‘माझ्या नशिबात असेच आहे, मी अशीच आहे.’ भावसत्संगात सकारात्मक विचार करायला सांगितल्यानंतर कोणताही प्रसंग घडला, तरी ‘यातून भगवंताला मला काय शिकवायचे आहे ?’, असा विचार केल्यामुळे मला प्रसंगातून शिकून पुढे जाता आले.’
संकलक : कु. वैष्णवी वेसणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) आणि कु. योगिता पालन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
११. सौ. मुक्ता सावंत, पुणे
११ अ. घरातील कामे म्हणजे सेवा वाटणे : ‘आधी घरातील कामे करतांना मी त्याकडे एक काम म्हणून बघत होते. आता ‘ते काम नाही, तर सेवा आहे’, असा विचार होतो. आता माझी घरातील निर्जीव वस्तूंकडे बघण्याची दृष्टी पालटली आहे, उदा. कपडे धुण्याच्या यंत्राविषयी मला कृतज्ञता वाटते.
११ आ. प्रेमभाव वाढणे : सेवा करतांना मी प्रथम दुसर्यांचे स्वभावदोष बघत होते; पण आता ‘त्यांना समजून कसे घ्यायला पाहिजे ? ते किती कठीण परिस्थितीतून सेवेला येतात ?’, असा माझ्या मनात विचार येतो. ‘माझ्यातील प्रेमभाव वाढला आहे’, असे मला वाटते.’
१२. सौ. मनीषा मिश्रा, बिहार
१२ अ. भावसत्संगात देवाला अनुभवता येऊन आनंद मिळणे : ‘भावसत्संग चालू झाल्यावर आरंभी त्यामध्ये माझे मन लागत नसल्याने मला झोप येत होती. भावार्चना घेतली जातांना मला समजले, ‘देव आहे. देवाला अनुभवणे म्हणजे काय ?’, हे मी सर्व प्रत्यक्ष अनुभवले. ईश्वराच्या भक्तांना भगवंताविषयीचा अनुभव येतो, तो मला भावसत्संगाच्या वेळी आला आणि आनंद मिळाला.
१२ आ. ‘कर्तेपणा जाऊन सर्वकाही देव करतो’, असे वाटणे : पूर्वी माझ्याकडून प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या स्तरावर केली जायची. ‘माझ्यापाशी ज्ञान आहे, मी करू शकते. माझी क्षमता पुष्कळ अधिक आहे’, असे मला वाटायचे. माझे ‘प्रत्येक गोष्टीत कर्तेपणा घेणे’, असे होत होते. ‘देव आहे, तोच सांभाळतो, तोच सगळे करून घेतो. आपण कर्तेपणा देवाला अर्पण केला, तर आपल्याला आतून हलकेपणा वाटतो’, असे सत्संगात ऐकल्यानंतर माझे त्याप्रमाणे प्रयत्न चालू झाले. आता ‘गुरुदेवांनीच माझ्यात आत्मबळ निर्माण केले आहे’, असे वाटते. ‘कुठलीही गोष्ट मी करत आहे किंवा माझ्यामुळे झाले’, असे आता मला वाटत नाही.’
१३. सौ. लक्ष्मी पै, दक्षिण कर्नाटक
१३ अ. ‘घरातील कामे म्हणजे आश्रमसेवा आहे’, असे समजून केल्याने ताण न येणे : ‘मला घरातील कामे करून प्रसारसेवेला जावे लागते. ‘मला फार कामे आहेत’, असे वाटून ताण यायचा. आता ‘घर हाही आश्रम आहे आणि येथील प्रत्येक काम म्हणजे आश्रमातील सेवाच आहे’, असा भाव ठेवल्याने कोणतेही काम करतांना माझी चिडचिड होत नाही. आता भांडी घासतांना माझा नामजप होतो. भांडी अधिक असली, तरी माझ्या मनात ‘मी आश्रमातील भांडी घासत आहे’, असा विचार येतो.’
(क्रमशः)
– (सर्व सूत्रांचा दिनांक १०.४.२०१९)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |