‘राष्ट्रीय एकात्मता आणि अखंड भारत’ यांसाठी २८ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांचे सांगली येथे शिबिर ! – जनकल्याण समिती

सांगली, २४ ऑक्टोबर (वार्ता.) – भारताच्या ईशान्य राज्यांमधील अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना एकत्र आणून ‘राष्ट्रीय एकात्मता आणि अखंड भारत’, यांसाठी २८ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत विश्रामबाग येथील श्री कांतीलाल शहा प्रशाला येथे पूर्वांचल शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. संजय कुलकर्णी आणि श्री. नारायण जोशी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

१. ‘शिक्षणातून राष्ट्रीय एकात्मता’, हे सूत्र साध्य करण्याच्या हेतूने ईशान्य भारतातील ७ प्रांतांमधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी महाराष्ट्रातील विविध वसतीगृहांत शिक्षण घेत आहेत. या सर्व छात्रांचे हे एकत्रित शिबिर असून या शिबिरात सांस्कृतिक कार्यक्रम, शोभायात्रा, मातृहस्ते भोजन, मातृभूमी दर्शन सहल अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

२. २९ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजता सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

३. ३० ऑक्टोबर या दिवशी दुपारी ४ वाजता विश्रामबाग चौक परिसरात पारंपरिक वेशामध्ये सर्व शिबिरांतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांची भव्य शोभायात्रा आयोजित केली आहे. यात ईशान्य भारतातील संस्कृती आणि सामाजिक समरसता यांचे दर्शन या निमित्ताने घडेल.

४. या शिबिराच्या स्वागत समितीमध्ये डॉ. संजय कुलकर्णी, डॉ. प्रियदर्शन चितळे, श्री. किशोर लुल्ला, श्री. मिलिंद गाडगीळ, श्री. विलासकाका चौथाई, श्री. शरद छत्रे, श्री. सागर घोंगडे यांचा प्रमुख सहभाग आहे.