मुंबईमध्ये श्री लक्ष्मीदेवीचे चित्र असलेल्या फटाक्यांची विक्री !

मुंबई, २३ ऑक्टोबर (वार्ता.) – शहरातील दहिसर रेल्वेस्थानकावर (पूर्व) येथील बंद असलेल्या पादचारी पुलाखाली श्री बाटलादेवी मंदिराच्या बाजूला असलेल्या काही फटाके विक्रेत्यांनी श्री लक्ष्मीदेवीचे चित्र असलेले फटाके विक्रीसाठी ठेवले आहेत. २० ऑक्टोबर या दिवशी येथील रहिवासी श्री. हर्षद पालये यांनी या विक्रेत्यांकडे श्री लक्ष्मीदेवीचे चित्र असलेले फटाके विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे पाहिले. याविषयी त्यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’ला माहिती दिली.

काही वर्षांपूर्वी श्रीविष्णु, श्री गणपति, श्री लक्ष्मीदेवी या देवतांसह सुभाषचंद्र बोस यांची चित्रे असलेले फटाके बाजारात विक्रीसाठी येत होते. हे फटाके वाजल्यानंतर देवता आणि राष्ट्रपुरुष यांच्या चित्राच्या चिंधड्या होत असल्यामुळे, तसेच ते पायदळी तुडवले जात असल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जातात. त्यामुळे समाजातून या फटाक्यांना विरोध होत आहे. त्यामुळे मागील २-३ वर्षांपासून देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके अल्प झाले आहेत; मात्र काही आस्थापनांकडून अजूनही देवतांची चित्रे असलेल्या फटाक्यांची निर्मिती केली जात असल्याचे आढळून येत आहे.

संपादकीय भूमिका

हिंदूंनो, श्री लक्ष्मीदेवीचा अवमान होऊ नये, यासाठी वेळीच संघटित होऊन अशा प्रकारच्या फटाक्यांना वैध मार्गाने विरोध करा !