अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन २४ ऑक्टोबरला साजरी करणार दिवाळी !

उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस आणि पूर्व राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वसुबारस या दिवशी साजरी केली दिवाळी !

वॉशिंग्टन (अमेरिका) – जगभरात यंदा दिवाळी मोठ्या प्रमाणात साजरी केली जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजे २४ ऑक्टोबरला व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करणार आहेत. या कार्यक्रमाला त्यांनी अनेक भारतियांना आमंत्रित केले आहे. परराष्ट्रमंत्री एंटनी ब्लिंकन यांनी पाडव्याला म्हणजे २६ ऑक्टोबर या दिवशी प्रशासकीय अधिकार्‍यांसमवेत दिवाळी समारोहाचे आयोजन केले आहे. यामध्ये प्रसिद्ध खासदारही सहभागी होणार आहेत.

दुसरीकडे अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी वसुबारस या दिवशी म्हणजे २१ ऑक्टोबरला त्यांच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. सरकारी निवास ‘द नैवल ऑब्जर्वेटरी’ येथे हॅरिस यांनी १०० हून अधिक भारतीय वंशाच्या लोकांना आमंत्रित केले होते. या वेळी त्या म्हणाल्या की, दिवाळी हा वैश्‍विक सण आणि विचार असून तो संस्कृतींच्या पलीकडे आहे. हा सण अंध:कारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक आहे. या कार्यक्रमाला प्रसिद्ध शल्यचिकित्सक (सर्जन) जनरल डॉ. विवेक मूर्ती, राष्ट्राध्यक्षांचे विशेष सल्लागार नीरा टंडन आणि त्यांचे भाषण लिहिणारे विनय रेड्डी आदी उपस्थित होते.

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लॉरिडा येथील त्यांच्या ‘मार-ए-लागो’ या निवासस्थानी भारतीय वंशाच्या लोकांसमवेत दिवाळी साजरी केली.