सप्तर्षींच्या आज्ञेनुसार श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची चालू असलेली अष्टविनायक यात्रा !

‘सप्तर्षी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सप्तर्षींनी सांगितले आहे, ‘वर्ष २०२२ च्या विजयादशमीनंतर श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी महाराष्ट्रातील अष्टविनायकांचे दर्शन घ्यावे. या दौर्‍याच्या वेळी गणपतीशी संबंधित अन्य काही प्रमुख गणपति मंदिरांतही जाऊन मूर्तीचे दर्शन घ्यावे आणि ‘साधकांची प्राणशक्ती वाढावी, तसेच हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, यासाठी गणपतीला प्रार्थना करावी.’

श्री बल्लाळेश्वर मंदिर

सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी १०.१०.२०२२ पासून महाराष्ट्रातील गणपति मंदिरांत दर्शनाला जाण्यास आरंभ केला आहे. त्यांनी १४.१०.२०२२ या दिवशी आधी पाली येथील बल्लाळेश्वर, नंतर महड येथील वरद विनायक आणि शेवटी ओझरचा विघ्नेश्वर यांचे दर्शन घेतले.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

पाली येथील ‘बल्लाळेश्वर’ गणपतीचे दर्शन घेऊन प्रार्थना करतांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना आलेली अनुभूती

श्री. विनायक शानभाग

१. मंदिरातील पुजार्‍यांनी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प करून घेणे

‘पाली येथील बल्लाळेश्वर मंदिरात पोचल्यावर श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी पुजार्‍यांना सांगितले, ‘‘आम्ही हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, यासाठी प्रार्थना करायला येथे आलो आहोत.’’ लगेच तेथील पुजार्‍यांनी मुख्य पुजार्‍यांना बोलवले आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना बल्लाळेश्वरासमोर उभे रहाण्यास सांगून त्यांच्याकडून हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प करून घेतला.

२. पुजारी प्रार्थना करत असतांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना आलेली अनुभूती

पुजारी देवाला साकडे घालत असतांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या हातात एक नारळ होता. हा नारळ वाई येथील महागणपतीने अष्टविनायकांना अर्पण करण्यासाठी दिला होता. त्या वेळी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना असे जाणवले, ‘पुजारी जी प्रार्थना करत होते, ती प्रार्थना हातातील नारळाच्या आत जाऊन घुमत आहे आणि नंतर प्रार्थनेतील ते शब्द स्वतःला ऐकू येत आहेत.’

– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), पुणे, महाराष्ट्र. (१८.१०.२०२२)

अष्टविनायकांना प्रार्थना !

स्वस्ति श्रीगणनायको गजमुखो मोरेश्वरः सिद्धिदःबल्लाळस्तु विनायकस्त्वथ मढे चिन्तामणिस्थेवरे ।
लेण्याद्रौ गिरिजात्मजः सुवरदो विघ्नेश्वरश्चोझरेग्रामे राञ्जणसंस्थितो गणपतिः कुर्यात् सदा मङ्गलम् ।।

अर्थ : गणांचा स्वामी असलेल्या श्री गजाननाचे, तसेच मोरगावचा मोरेश्वर, सिद्धटेक येथील (सर्व सिद्धी देणारा) सिद्धेश्वर यांचे जो स्मरण करतो, त्याचे कल्याण होवो. पाली येथे ‘बल्लाळेश्वर’ या नावाने रहाणारा, महड येथील ‘वरदविनायक’, थेऊर येथील ‘चिन्तामणि’, लेण्याद्रीचा ‘गिरिजात्मज’, उत्तम वर देणारा ओझरचा ‘विघ्नेश्वर’, रांजणगावचा ‘महागणपति’ सर्वांवर सदैव कृपा करो !

 

पाली येथील ‘बल्लाळेश्वर’ गणपतीचा इतिहास !

पाली येथील बल्लाळेश्वर

१. स्थान

‘रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात सरसगड नावाचा किल्ला आणि अंबा नदी यांच्यामध्ये वसलेल्या पाली नामक गावी ‘श्री बल्लाळेश्वर’ गणेशाचे मंदिर आहे. अष्टविनायकांतील अत्यंत जागृत असलेले हे तीर्थक्षेत्र श्री गणेशभक्तांचे अत्यंत आवडते स्थान आहे. ‘पेशव्यांच्या काळी याच गणेशाची शपथ घेऊन न्यायालयाचे कामकाज चालू होत असे’, असे म्हणतात.

२. श्री गणेशाला ‘बल्लाळेश्वर’ हे नाव कसे पडले ?

२ अ. पाषाणाच्या शिळेला गणपति मानून गणेशभक्त बल्लाळने भव्य पूजा करणे : कृतयुगातील पल्लीपूर (आताचे पाली) या गावात ‘बल्लाळ’ नावाचा एक बुद्धीमान आणि सुंदर मुलगा रहात होता. लहानपणापासून त्याला गणेशभक्तीची ओढ होती. एकदा तो त्याच्या सवंगड्यांसह दूर रानात खेळायला गेला असता दाट झाडीखाली त्याला पाषाणाची एक शीळा दिसली. त्याला गणपति मानून बल्लाळने मंदार, शमी, कमळ, जास्वंद यांनी, तसेच डाळिंब, केळी आणि आंबे या फळांचा नैवेद्य दाखवून भव्य पूजा केली.

२ आ. वडिलांनी बल्लाळला पुष्कळ मारणे आणि अस्ताव्यस्त झालेली गणेशपूजा पाहून बल्लाळने शाप देणे : बराच उशीर होऊनही रानातून मुले घरी न आल्यामुळे सर्वांचे पालक मुलांना शोधण्यासाठी रानात गेले. तेथे ही गणेशपूजा पाहून बल्लाळचे वडील कल्याण यांनी बल्लाळला पुष्कळ मारले. आपल्या पागोट्याने बल्लाळला झाडाला बांधून ते निघून गेले. दुसर्‍या दिवशी शुद्धीवर आल्यावर बल्लाळने अस्ताव्यस्त झालेली गणेशपूजा पाहून ‘ज्या कोणी हे दुष्कृत्य केले, त्याला व्याधी होऊ देत आणि त्याचे शरीर दुर्गंधी होऊ दे’, असा शाप दिला.

२ इ. बल्लाळच्या उग्र तपसाधनेमुळे ॐ कार गणेश पूजलेल्या शिळेमध्ये अंतर्धान पावणे आणि या गणेशाला ‘बल्लाळेश्वर’ असे नाव पडणे : पुढे बल्लाळच्या उग्र तपसाधनेमुळे साक्षात् गणेशाने त्याला दर्शन देऊन त्याची सुटका केली. निःस्वार्थ बल्लाळसाठी ॐ कार गणेश पूजलेल्या त्या शिळेमध्ये अंतर्धान पावला. गणेशाने पाली येथे नित्य वास्तव्य केले. बल्लाळसाठी त्याचा ईश्वर धावून आला; म्हणून लोक या गणेशाला ‘बल्लाळेश्वर’ असे म्हणू लागले आणि हे स्थानही ‘बल्लाळेश्वर’ म्हणून प्रसिद्ध झाले.

३. पाली येथील चिरेबंदी दगडांचे श्री गणेश (बल्लाळेश्वर) मंदिर !

पाली येथील गणेश मंदिर पूर्वी लाकडी होते. अलीकडच्या चार दशकांपूर्वी महान गणेशभक्त श्रीमंत बाबूरावजी फडणीस आणि त्यांचे चिरंजीव मोरोबादादा यांनी या मंदिराचा जीर्णाेद्धार करून दगडी बांधकाम केले. चिरेबंदी दगडांचे हे मंदिर पुष्कळ मजबूत आहे. मंदिराच्या परिसरात २ तलाव आहेत. मंदिराच्या आवारात एक पुष्कळ मोठी घंटा असून ती चिमाजीअप्पांनी बल्लाळेश्वरास अर्पण केली आहे.

४. डाव्या सोंडेची, अर्धगोलाकार सिंहासनावर आसनस्थ असलेली श्री बल्लाळेश्वर गणपतीची मूर्ती !

बल्लाळेश्वर मंदिर आणि मूर्ती दोन्ही पूर्वाभिमुख आहेत. दक्षिणायनात सूर्याचे किरण थेट गणेशमूर्तीवर पडतात. या किरणांमुळे श्रींच्या डोळ्यांतील आणि नाभीतील हिरे आसमंत झळाळून टाकतात. या मंदिराच्या गाभार्‍यात अर्धगोलाकार सिंहासनावर आसनस्थ असलेली श्री गणेशाची मूर्ती डाव्या सोंडेची आहे. सिंहासनाच्या मागील चांदीच्या प्रभावळीवर ‘ऋद्धिसिद्धि चवर्‍या ढाळत आहेत’, असे कोरीवकाम आहे. गाभार्‍यासमोर मूषक दोन्ही हातांत मोदक घेऊन गणेशाकडे पहात उभा आहे.

५. बल्लाळेश्वर मंदिराजवळ असलेले श्री धुंडी विनायकाचे मंदिर !

बल्लाळेश्वर मंदिराजवळच श्री धुंडी विनायकाचे मंदिर असून येथील गणेशमूर्तीही स्वयंभू आहे. येथे प्रथम दर्शन घेण्याची प्रथा आहे. बल्लाळाच्या वडिलांनी फेकून दिलेली गणेशमूर्ती, म्हणजेच श्री धुंडी विनायक होय !’

(संदर्भ ग्रंथ : अष्टविनायक यात्रा, लेखक : डॉ. बी.पी. वांगीकर)