आश्विन शुक्ल चतुर्दशीला म्हणजेच नरकचतुर्दशीला मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी करण्यात येते. दिवाळी साजरी करण्यामागील पौराणिक संदर्भ ‘नरकासुर वधा’चा आहे. ही कथा भागवत पुराणात आलेली आहे. दिवाळीच्या निमित्ताने त्या कथेचा सारांश पुढे दिला आहे.
१. नरकासुराचे अत्याचार
‘नरकासूर हा भूमीचा पुत्र म्हणून त्याचे ‘भौमासूर’ हे नाव रूढ होते. प्राग्ज्योतिषपूर (आसाम) ही त्याची राजधानी ! त्याने वरुणाचे छत्र आणि देवमाता अदितीची कुंडले हिरावून घेतली. इतकेच नव्हे, तर मेरूपर्वतावरील देवतांचे मणिपर्वत नावाचे निवासस्थान स्वतःच्या कह्यात घेतले. त्यामुळे त्रस्त झालेले देव इंद्राकडे गेले आणि त्यांनी भौमासुराचे अत्याचार त्याला निवेदन केले.
२. इंद्राने श्रीकृष्णाला भौमासुराविषयी सांगून त्याच्या जाचातून सोडवण्याची विनंती करणे
भगवान श्रीकृष्णच भौमासुराचे पारिपत्य करू शकेल, हे जाणून देवराज इंद्र द्वारकेला गेला आणि त्याने श्रीकृष्णाला भौमासुराविषयी सांगून त्याच्या जाचातून सोडवण्याची विनंती केली. ‘विनाशाय च दुष्कृताम् ।’ (अर्थ : पापकर्म करणार्यांचा नाश करण्यासाठी)साठी भूतलावर अवतरलेले भगवान तात्काळ गरुडावर आरूढ होऊन सत्यभामेसह प्राग्ज्योतिषपूरकडे निघाले.
३. श्रीकृष्णाने प्राग्ज्योतिषपुराची अभेद्य संरक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करणे
प्राग्ज्योतिषपुराची संरक्षण व्यवस्था इतकी विलक्षण होती की, आत प्रवेश करणे कठीण होते. त्या नगराच्या सभोवती असलेले गड श्रीकृष्णाने फोडले, बाणांनी शस्त्रांचे कुंपण तोडले. सुदर्शनचक्राने अग्नी, पाणी आणि ज्वालाग्रही वायूचे खंदक फोडले अन् तलवारीने जाळी तोडली. त्याने पांचजन्य शंख फुंकला. तो आवाज ऐकताच पाण्यात झोपलेला पाच डोक्यांचा मुरदैत्य खडबडून उठला आणि त्रिशूळ उगारून त्याने पाचही मुखाने केलेल्या गर्जनेने दशदिशा निनादल्या.
४. श्रीकृष्णाने मुरदैत्याचा वध करणे
मुरदैत्याच्या उघडलेल्या मुखात श्रीकृष्णाने असंख्य बाण मारले. त्यामुळे खवळून त्याने स्वतःची गदा श्रीकृष्णावर फेकली. श्रीकृष्णाने स्वतःची गदा फेकून त्या गदेचा चक्काचूर केला. नंतर श्रीकृष्णाने सुदर्शनचक्राने त्याची पाचही मस्तके उडवली.
५. ताम्र, अंतरिक्ष आदी नावांचे ७ पुत्र वडिलांच्या (मुरदैत्याच्या) वधाचा सूड उगवण्यासाठी युद्धास सिद्ध झाले. भौमासुराच्या आज्ञेवरून पीठ नावाच्या दैत्याला सेनापती करून ते श्रीकृष्णाशी युद्ध करण्यास गेले. श्रीकृष्णाने बाण आणि सुदर्शनचक्र यांद्वारे त्या सर्वांना यमसदनाला पाठवले.
६. श्रीकृष्णाने भौमासुराशी युद्ध करून त्याचा वध करणे
हे ऐकून स्वतः भौमासुर सैन्य घेऊन युद्धासाठी आला. श्रीकृष्णाने त्याच्या सैन्यावर असंख्य बाण सोडून त्याचा वध केला. शेवटी हत्तीवर बसलेला भौमासूर श्रीकृष्णाला मारण्यासाठी त्रिशूळ फेकणार, इतक्यात भगवान श्रीकृष्णाने सुदर्शनचक्राद्वारे त्याचे मस्तक उडवले. ते पाहून ऋषींनी जयजयकार आणि देवतांनी पुष्पवर्षाव केला. तेव्हा भूमीने येऊन श्रीकृष्णाला वैजयंती माळ आणि वनमाला घातली, तसेच भौमासुराने पळवून आणलेले वरुणाचे छत्र आणि आदितीची कुंडले श्रीकृष्णाच्या स्वाधीन केली.
७. श्रीकृष्णाने १६ सहस्र राजकन्यांना वस्त्रालंकार देऊन द्वारकेला पाठवणे
यानंतर भगवान श्रीकृष्णाने भौमासुराच्या महालात प्रवेश केला. त्या ठिकाणी भौमासुराने अनेक राजांना जिंकून आणलेल्या १६ सहस्र राजकन्या होत्या. त्यांनी श्रीकृष्णाला पहाताच मनोमन स्वतःचा पती म्हणून त्यांना वरले. भगवंताने त्यांचा शुद्ध प्रेमभाव ओळखून त्यांना उत्तमोत्तम वस्त्रालंकार देऊन द्वारकेला पाठवून दिले.
८. आनंदाप्रीत्यर्थ लोकांनी साजरी केली दीपावली !
नरकासुराचा वध आश्विन शुक्ल चतुर्दशीला करून श्रीकृष्णाने १६ सहस्र राजकन्या आणि देवता यांना नरकासुराच्या भयापासून मुक्त केले. या आनंदाप्रीत्यर्थ लोकांनी मंगलस्नान करून आणि दिवे लावून हा दिवस साजरा केला. तीच ही दीपावली !’