सप्तर्षींच्या आज्ञेनुसार श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची चालू असलेली अष्टविनायक यात्रा !

‘सप्तर्षी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सप्तर्षींनी सांगितले आहे, ‘वर्ष २०२२ च्या विजयादशमीनंतर श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी महाराष्ट्रातील अष्टविनायक (मोरगाव येथील मयुरेश्‍वर, थेऊर येथील ‘चिन्तामणि’, सिद्धटेक येथील सिद्धिविनायक, रांजणगाव येथील महागणपति, ओझर येथील विघ्नेश्‍वर, लेण्याद्री येथील गिरिजात्मज, महड येथील वरदविनायक आणि पाली येथील बल्लाळेश्‍वर) यांचे दर्शन घ्यावे. या दौर्‍याच्या वेळी गणपतीशी संबंधित अन्य काही प्रमुख गणपति मंदिरांतही जाऊन मूर्तीचे दर्शन घ्यावे आणि ‘साधकांची प्राणशक्ती वाढावी, तसेच हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, यासाठी गणपतीला प्रार्थना करावी.’

सिद्धटेक येथील सिद्धिविनायक

सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी १०.१०.२०२२ पासून महाराष्ट्रातील गणपति मंदिरांत दर्शनाला जाण्यास आरंभ केला आहे. त्यांनी १२.१०.२०२२ या दिवशी ‘सिद्धटेक’ येथे जाऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.


श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी ‘सिद्धटेक’ या पवित्र क्षेत्री घेतले ‘सिद्धिविनायका’चे दर्शन !

सिद्धटेक येथील सिद्धिविनायकाच्या मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. प्रवासात मिळालेले शुभसंकेत ! : ‘मोरगाव ते सिद्धटेक’ असा प्रवास करतांना वाटेत शुभ प्रचीती असलेला भारद्वाज पक्षी आणि मुंगुस यांचे छान दर्शन झाले.

श्री. विनायक शानभाग

२. ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रार्थना करणार्‍या श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ एकमेव आहेत’, असे मंदिरातील पुजार्‍यांनी सांगणे : ‘श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ ‘हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, यासाठी प्रार्थना करायला सिद्धटेकला आल्या आहेत’, हेे कळल्यावर मंदिरातील पुजारी म्हणाले, ‘‘आतापर्यंत सिद्धिविनायकाला अशी प्रार्थना करायला कुणीच आलेले नाही. अशी प्रार्थना करणार्‍या तुम्हीच एकमेव आहात !’’

मंदिरात पुजार्‍यांकडून प्रसादरूपी नारळ स्वीकारतांना श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

३. परतीच्या प्रवासात देवाचा आशीर्वाद मिळाल्याप्रमाणे छान पाऊस येणे : सिद्धटेकला जातांना पाऊस नव्हता; पण सिद्धिविनायकाचे दर्शन झाल्यावर परतीच्या प्रवासात देवाचा आशीर्वाद मिळाल्याप्रमाणे छान पाऊस आला.’

– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), पुणे, महाराष्ट्र. (१८.१०.२०२२)

अष्टविनायकांना प्रार्थना !

स्वस्ति श्रीगणनायको गजमुखो मोरेश्‍वरः सिद्धिदःबल्लाळस्तु विनायकस्त्वथ मढे चिन्तामणिस्थेवरे ।
लेण्याद्रौ गिरिजात्मजः सुवरदो विघ्नेश्‍वरश्‍चोझरेग्रामे राञ्जणसंस्थितो गणपतिः कुर्यात् सदा मङ्गलम् ॥

अर्थ : गणांचा स्वामी असलेल्या श्री गजाननाचे, तसेच मोरगावचा मोरेश्‍वर, सिद्धटेक येथील (सर्व सिद्धी देणारा) सिद्धेश्‍वर यांचे जो स्मरण करतो, त्याचे कल्याण होवो. पाली येथे ‘बल्लाळेश्‍वर’ या नावाने रहाणारा, महड येथील ‘वरदविनायक’, थेऊर येथील ‘चिन्तामणि’, लेण्याद्रीचा ‘गिरिजात्मज’, उत्तम वर देणारा ओझरचा ‘विघ्नेश्‍वर’, रांजणगावचा ‘महागणपति’ सर्वांवर सदैव कृपा करो !

‘मधू’ आणि ‘कैटभ’ या दैत्यांचा पराभव करण्यासाठी ‘सिद्धटेक’ येथे प्रकट झालेला उजव्या सोंडेचा ‘सिद्धिविनायक’ गणपति !

१. ‘सिद्धटेक’ या स्थानाचे महत्त्व

‘योजिलेले कार्य सिद्धीस नेणारा’, अशी या गणेशाची ख्याती आहे. भीमा नदीच्या तटी वसलेल्या ‘सिद्धटेक’ या पवित्र क्षेत्राचा समावेश नगर जिल्ह्यातील कर्जत या तालुक्यात होतो. चिंचवडचे महान गाणपत्य साधू श्री मोरया गोसावी यांनी प्रथम ‘सिद्धटेक’ येथे गणेश आराधना केली होती. केडगावचे संत श्री नारायण महाराज यांनीही येथे गणेश उपासना केली होती. हे स्थान अत्यंत सिद्धीदाते आहे.

२. श्रीविष्णूने ‘सिद्धक्षेत्र’ या ठिकाणी मंत्रजपाचे अनुष्ठान केल्याने श्री गणेश प्रसन्न होणे आणि गणेशाने ‘मधू’ अन् ‘कैटभ’ या दैत्यांचा पराभव करणे

मधू आणि कैटभ या दैत्यांनी ब्रह्मदेवाची कठोर तपश्‍चर्या करून पुढील जन्मातील अमरत्वाचे वरदान प्राप्त करून घेतले होते. ब्रह्माने ‘या दोघांचा मृत्यू श्रीविष्णूकडून होईल’, असे सांगून त्यांच्या मृत्यूचे विशिष्ट स्थान त्यांच्या कानात सांगितले. या वरदानामुळे हे दोन्ही दैत्य साधू-संत, सज्जन आणि ऋषिमुनी यांना त्रास देऊ लागले. नंतर भगवान शिवाच्या सांगण्यावरून श्रीविष्णूने सिद्धक्षेत्र ठिकाणी ‘ॐ’ या एकाक्षरी मंत्राचे आणि ‘गणेशाय नमः ।’ या षडाक्षरी मंत्रजपाचे अनुष्ठान चालू केले. श्रीविष्णूच्या तपसामर्थ्यामुळे श्री गणेश प्रसन्न होऊन स्वतः चतुरंग सेना घेऊन रणांगणावर आला. त्याने मधू आणि कैटभ या दैत्यांचा पराभव केला. ‘भविष्यात कुठलाही दैत्य उन्मत्त झाल्यास त्याचा सर्वनाश करण्याची सिद्धी श्रीविष्णूने ॐ काराकडून मागून घेतली’, अशीही आख्यायिका आहे.

३. सिद्धक्षेत्री प्रकट झालेली उजव्या सोंडेची श्री गणेशमूर्ती !

सिद्धक्षेत्री प्रकट झालेली श्री गणेशमूर्ती उजव्या सोंडेची असून अष्टविनायकांमध्ये ही एकमेव उजव्या सोंडेची मूर्ती आहे. ही मूर्ती गंडकीय पाषाणाची आणि गजवक्त्रादी चिन्हांनी युक्त आहे. गणेशाच्या कृपेने विष्णूला दैत्य वधाची सिद्धी प्राप्त झाल्याने या क्षेत्रास ‘सिद्धटेक’ आणि गणेशास ‘सिद्धिविनायक’ हे नाव पडले. या मंदिराजवळ महर्षि व्यासांनी यज्ञ केलेले स्थान आहे. आजही येथे भस्मासारखी माती आहे.

४. कलाकुसरीने युक्त मंदिर आणि ऋद्धिसिद्धिसहित असलेली सिद्धिविनायकाची मूर्ती !

हे मंदिर आणि स्वयंभू मूर्ती उत्तराभिमुख आहे. हे मंदिर कलाकुसरीने युक्त असून बहुधा पेशवेकालीन असावे. या मंदिराचा गाभारा पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला आहे. सिद्धिविनायकाच्या मूर्तीभोवती मखर असून दोन्ही बाजूंना जय-विजय यांच्या उभ्या मूर्ती आहेत. सिद्धिविनायकाची मूर्ती मांडी घातलेली असून दगडी सिंहासनावर स्थित आहे. त्यावर ऋद्धिसिद्धि बसलेल्या आहेत. मागे आकर्षक प्रभावळ आहे. वर गरुड, सूर्य-चंद्र आणि मध्यभागी नाग यांच्या प्रतिमा आहेत. गाभार्‍यातच देवाचे शेजघर आणि एका बाजूला शिव पंचायतन आहे.’

(संदर्भ : अष्टविनायक यात्रा, डॉ. बी.पी. वांगीकर)