‘प्रतापगडाची प्रतिकृती’ साकारण्याचा ‘विद्यामंदिर प्रशालेचा’ उपक्रम
मिरज, २० ऑक्टोबर (वार्ता.) – दीपावलीच्या निमित्ताने ‘मिरज विद्या समिती’च्या वतीने विद्या मंदिर प्रशालेत शिवप्रतापाने पावन झालेल्या ‘प्रतापगडाची प्रतिकृती’ साकारण्याचा उपक्रम म्हणजे आदर्श युवा पिढी घडवण्यासाठीची पायाभरणीच आहे, असे प्रतिपादन श्री. बाळासाहेब तथा सु.ग. स्वामी यांनी केले. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या संयुक्त कल्पकतेतून साकारण्यात आलेल्या प्रतापगडाची १२ फूट आणि २० फूट लांब बनवलेली भव्य प्रतिकृती आणि शिवकालीन शस्त्रास्त्रे यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते.
विद्या मंदिर प्रशालेत उभारलेल्या या प्रतिकृती, तसेच शस्त्र प्रदर्शनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील ‘सव्यासाची गुरुकुलम्’चे बहुमूल्य योगदान लाभले. या प्रसंगी मिरज विद्या समितीचे श्री. शैलेश देशपांडे, मुख्याध्यापक श्री.आर्.व्ही. कुलकर्णी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. बाळासाहेब विभुते, ह.भ.प. ग्रामोपाध्ये, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
हे प्रदर्शन २३ ऑक्टोबरपर्यंत सकाळी १० ते दुपारी १, तसेच दुपारी ३.३० ते रात्री ७.३० पर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे, तरी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशालेच्या वतीने करण्यात आले आहे.