जागृत मतदारांनी प्रस्थापितांना दाखवली त्यांची जागा
सातारा, १९ ऑक्टोबर (वार्ता.) – राज्यात १ सहस्र १६६ ग्रामपंचायतींपैकी १ सहस्र ७९ ग्रामपंचायतींचे निकाल घोषित झाले. विविध जिल्ह्यांमध्ये ८७ ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडी झाल्या; मात्र सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील भणंग ग्रामपंचायतीच्या निकालाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रस्थापित उमेदवारांच्या पॅनेलला नाकारात मतदारांनी स्थानिक अपक्षांना विजयी केले. त्यामुळे भणंग ग्रामस्थांनी प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवून दिल्याची चर्चा जिल्ह्यात चालू आहे.
सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांचे पॅनेल निवडणुकीला उभे होते; मात्र जागृत मतदारांनी दोन्ही पॅनेलला मतदान न करता, सर्व ७ अपक्ष उमेदवारांना निवडून देत एक वेगळा आदर्श संपूर्ण राज्यासमोर ठेवला आहे. या निकालामुळे लोकशाहीमध्ये मतदार हा खरा ‘राजा’ असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. भणंग ग्रामपंचायतीचा आदर्श राज्यातील सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन भणंग ग्रामस्थ करत आहेत.