‘राष्ट्रोत्कर्ष समारोह समिती’च्या वतीने चंद्रपूर येथे ‘विराट दिव्य धर्म संमेलना’चे आयोजन
चंद्रपूर, १९ ऑक्टोबर (वार्ता.) – भारत हिंदु राष्ट्र होईल, या माझ्या वक्तव्यानंतर संपूर्ण विश्वस्तरावर चर्चा होत आहे. हिंदूंची स्थिती अशी आहे की, तो कधी प्रशंसक, निंदक, समीक्षक किंवा तटस्थ असतो. ज्या कार्याचे आपण निमित्त होऊ, ते कार्य होईल. येत्या काळात भारत निश्चित हिंदु राष्ट्र होईल, असा पुनरुच्चार श्री गोवर्धनमठ पुरीचे पीठाधिश्वर शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी चंद्रपूर येथील ‘विराट दिव्य धर्म संमेलना’मध्ये केला.
राष्ट्रोत्कर्ष समारोह समितीच्या वतीने १८ ऑक्टोबर या दिवशी स्थानिक जगन्नाथ धाम, शकुंतला फार्मस् येथे ‘विराट दिव्य धर्म संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. या संमेलनामध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करतांना शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती म्हणाले, ‘‘भारत अवघ्या विश्वाच्या हृदयस्थानी आहे. साक्षात् ईश्वराची ही भूमी आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यासारख्या विरांगणा आणि महाराणा प्रताप यांच्यासारखे योद्धे या दिव्य भूमीत जन्माला आलेले आहेत. भारताला दिशाहिन करणे, म्हणजे अवघ्या जगाचीच दिशा बिघडवणे होय. तंत्रज्ञान आणि विज्ञान यांच्या युगातही सनातन धर्म अवघ्या जगाला मार्गदर्शन करत आहे.’’