सप्तर्षींच्या आज्ञेनुसार श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची चालू असलेली अष्टविनायक यात्रा !

अष्टविनायकांना प्रार्थना !

स्वस्ति श्रीगणनायको गजमुखो मोरेश्वरः सिद्धिदः
बल्लाळस्तु विनायकस्त्वथ मढे चिन्तामणिस्थेवरे ।
लेण्याद्रौ गिरिजात्मजः सुवरदो विघ्नेश्वरश्चोझरे
ग्रामे राञ्जणसंस्थितो गणपतिः कुर्यात् सदा मङ्गलम् ।।

अर्थ : गणांचा स्वामी असलेल्या श्री गजाननाचे, तसेच मोरगावचा मोरेश्वर, सिद्धटेक येथील (सर्व सिद्धी देणारा) सिद्धेश्वर यांचे जो स्मरण करतो, त्याचे कल्याण होवो. पाली येथे ‘बल्लाळेश्वर’ या नावाने रहाणारा, महड येथील ‘वरदविनायक’, थेऊर येथील ‘चिन्तामणि’, लेण्याद्रीचा ‘गिरिजात्मज’, उत्तम वर देणारा ओझरचा ‘विघ्नेश्वर’, रांजणगावचा ‘महागणपति’ सर्वांवर सदैव कृपा करो !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी मोरगाव येथील ‘मयुरेश्वरा’चे घेतले दर्शन !

‘सप्तर्षी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सप्तर्षींनी सांगितले आहे, ‘वर्ष २०२२ च्या विजयादशमीनंतर श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी महाराष्ट्रातील अष्टविनायक (मोरगाव येथील मयुरेश्वर, थेऊर येथील चिंतामणी, सिद्धटेक येथील सिद्धिविनायक, रांजणगाव येथील महागणपति, ओझर येथील विघ्नेश्वर, लेण्याद्री येथील गिरिजात्मज, महड येथील वरदविनायक आणि पाली येथील बल्लाळेश्वर) यांचे दर्शन घ्यावे. या दौर्‍याच्या वेळी गणपतीशी संबंधित अन्य काही प्रमुख गणपति मंदिरांतही जाऊन मूर्तीचे दर्शन घ्यावे आणि ‘साधकांची प्राणशक्ती वाढावी, तसेच हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, यासाठी गणपतीला प्रार्थना करावी.’

सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी १०.१०.२०२२ पासून महाराष्ट्रातील गणपति मंदिरांत दर्शनाला जाण्यास आरंभ केला आहे. या दौर्‍यात त्यांनी १२.१०.२०२२ या दिवशी मोरगाव येथील मयुरेश्वराचे दर्शन घेतले.

मोरगाव येथील ‘श्री मयुरेश्वर’ गणपति
श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

१. मोरगावला जाण्याच्या आदल्या रात्री श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी कालभैरवाला प्रार्थना करणे

श्री. विनायक शानभाग

‘१२.१०.२०२२ या दिवशी आम्ही मोरगाव येथे जाणार होतो. त्याच्या आदल्या रात्री श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी झोपतांना कालभैरव देवाला ‘मयुरेश्वर’ गणपतीचे दर्शन छान होऊ दे’, अशी प्रार्थना केली.

२. मोरगावला ‘भैरव’ देव गणपतीचा द्वारपाल असून मंदिरात गेल्यावर कालभैरवाचे वाहन, म्हणजे काळा कुत्रा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या जवळ येणे

आश्चर्य म्हणजे मोरगावला भैरव हा देव गणपतीचा द्वारपाल आहे. मंदिरात गेल्यावर कालभैरवाचे वाहन, म्हणजे काळा कुत्रा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या जवळ आला. खरेतर भैरव हा शक्तीपिठाच्या ठिकाणी, म्हणजे देवीच्या ठिकाणी द्वारपालक असतो. यावरून आदल्या दिवशी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना ‘भैरवाची आठवण का आली ?’, याची आम्हाला कल्पना आली.

३. मोरगावला पोचल्यावर बारीक पाऊस चालू होणे आणि गणपतीचे दर्शन झाल्यावर मोठा पाऊस येणे

मोरगाव येथे पोचल्यावर बारीक पाऊस चालू झाला आणि गणपतीचे दर्शन झाल्यावर मोठा पाऊस आला. हे पाहून असे वाटले, ‘जणू काही गणपति सांगत आहे, ‘मी तुमची प्रार्थना ऐकली आहे !’

४. मोरगाव येथील गणपति मंदिरातील पुजार्‍यांनी ‘मयुरेश्वरा’कडे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठीचा संकल्प केला.’

– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), पुणे, महाराष्ट्र. (१६.१०.२०२२)


मोरगावचे माहात्म्य आणि ‘श्री मयुरेश्वर’ गणपतीच्या मंदिर स्थापनेचा इतिहास !

‘श्री मयुरेश्वर’ गणपतीचे दर्शन घेतांना  श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. स्थान आणि महत्त्व

‘अष्टविनायकांत मोरगावच्या मयुरेश्वराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पुणे जिल्ह्यातील कर्‍हा नदीच्या काठी बारामती तालुक्यातील हे छोटेसे आणि रम्य स्थान आहे. महाराष्ट्रात श्री गणेशाची साडेतीन पीठे (मोरगाव येथे प्रथम पीठ, राजुर (जालना) येथे दुसरे पीठ, पद्मालय (जळगाव) येथे तिसरे पीठ आणि चिंचवड (पुणे) येथे अर्धे पीठ) आहेत.

२. सृष्टी निर्मितीच्या आधी ॐ कार गणेश मोरगावी सर्वप्रथम अवतरल्याने गणेश संप्रदायात मोरगावाला आद्य पिठाचा मान लाभणे

ॐ कार गणेशाच्या मनात सृष्टी निर्मितीची इच्छा झाली. त्या वेळी गणेशास पुष्कळ आनंद झाला. ब्रह्मदेवाकडे सृष्टी निर्मितीचे कार्य सोपवण्यापूर्वी गणेशाने स्वतःस झालेला आनंद शतगुणित करण्यासाठी भूमीच्या अंतर्भागात एक स्थान निर्माण केले.

ॐ कार स्वतः त्या स्थळी अवतरला; म्हणून या क्षेत्रास ‘स्वानंदपूर’ किंवा ‘भूस्वानंदभुवन’ असे म्हटले जाते. गणेश ज्या भागात प्रगटला, ते स्थळ मोराच्या आकारासारखे होते आणि तेथे पूर्वी मोरांची पुष्कळ वस्ती होती. त्यामुळे या क्षेत्रास सध्याचे प्रचलित ‘मोरगाव’ हे नाव पडले. सृष्टी निर्मितीच्या आधी ॐ कार गणेश मोरगावी सर्वप्रथम अवतरल्याने गणेश संप्रदायात या श्रीक्षेत्रास आद्य पिठाचा मान लाभला आहे.

३. ‘श्री ब्रह्मा-विष्णु-महेश-शक्ती-सूर्य’ या पंचदेवतांनी मयुरेश्वराची प्रतिष्ठापना करणे

सृष्टी निर्मितीच्या कार्यारंभी ‘श्री ब्रह्मा-विष्णु-महेश-शक्ती-सूर्य’ या पंचदेवतांनी ॐ कार गणेशाची प्रतिष्ठापना केली. पंचदेवतांनी प्रतिष्ठापना केलेली श्री मयुरेश्वराची मूळ मूर्ती माती, लोह आणि रत्ने यांची होती. कालांतराने या मूर्तीची झीज झाल्यामुळे ‘पांडवांनी ती तेथेच गुप्त स्वरूपात ठेवून नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना केली’, अशी आख्यायिका आहे.

४. मोरगावी ॐ काराने मोरावर बसून सिंदुरासुर आणि त्याचा सेनापती कमलासुर या दोन्ही दैत्यांचा वध केला; म्हणून गणेशास ‘मयुरेश्वर’ किंवा ‘मोरेश्वर’ हे नाव लाभले.

५. मोरया गोसावी यांनी मोरगावात घोर तपश्चर्या करणे

थोर गणेशभक्त संत मोरया गोसावी यांचा जन्म मोरगावात झाला. त्यांनी मोरगावात घोर तपश्चर्या केली. कर्‍हा नदीच्या ब्रह्मकमंडलू तीर्थात स्नान करतांना त्यांच्या ओंजळीत तांदळा गणपतीची मूर्ती आली. पुढे ही मूर्ती मोरया गोसावींनी चिंचवड, पुणे येथे नेली.

६. मंदिर आणि मंदिरातील विलोभनीय अशी श्री गणेशमूर्ती !

मोरगाव येथील गणपतीचे मंदिर भव्य आहे. येथील उंची तटबंदी आणि चारी बाजूंचे उंच स्तंभ भक्तांचे मन मोहून टाकतात. हे मंदिर आणि तेथील मूर्ती पूर्वाभिमुख आहे. महाद्वारासमोर एक दगडी दीपमाळ आणि श्री गणेशासमोर एक भव्य दगडी नंदी आहे. गणेशासमोर नंदी असणारे हे एकमेव गणेश मंदिर असावे. श्री गणेशाची मूर्ती बसलेली आणि शेंदूर लावलेली आहे. डाव्या सोंडेच्या या मूर्तीच्या नाभीत आणि डोळ्यांत हिरे आहेत. मस्तकावर नागाचा फणा असून डाव्या-उजव्या बाजूंस ऋद्धिसिद्धि यांच्या पितळी मूर्ती आहेत. पुढे उंदीर आणि मोर आहे. फुले, दूर्वा आणि पुष्पमाळा यांनी सजलेली मयुरेश्वराची मूर्ती पुष्कळ विलोभनीय दिसते. भाद्रपद चतुर्थी आणि माघ शुद्ध चतुर्थी (गणेशजन्म) या तिथींना येथे मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा होतो.

७. श्री समर्थ रामदासस्वामी येथील श्री गणेशाच्या दर्शनाला आले. तेव्हा त्यांना गणेशाची आरती सुचली. तीच ‘सुखकर्ता दुःखहर्ता… ।’ ही आरती होय.’

– डॉ. बी.पी. वांगीकर

(संदर्भ : अष्टविनायक यात्रा)