भारत पुढीलवर्षी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये जाणार नाही !

तटस्थ देशांत स्पर्धा आयोजित करण्याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची मागणी !

मुंबई / इस्लामाबाद – आशिया चषक क्रिकेट स्पर्धा पाकिस्तानमध्ये खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकमध्ये जाणार नाही. त्याऐवजी ही स्पर्धा तटस्थ देशात खेळवण्यात यावी, अशी मागणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बी.सी.सी.आय.ने) केली आहे. या मागणीवर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने टीका केली आहे. तसेच पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि माजी खेळाडू सईद अन्वर यांनीही टीका केली.

१. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पी.सी.बी.ने) भारतात वर्ष २०२३ मध्ये होणार्‍या विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली आहे. वर्ष २०१२ पासून दोन्ही देशांमध्ये मालिका झालेली नाही. वर्ष २००८ मध्ये भारताने आशिया चषक स्पर्धेसाठी शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता.

२. शाहिद आफ्रिदी याने ट्वीट करून म्हटले की, यातून ‘भारतात क्रिकेट प्रशासनाच्या अनुभवाचा अभाव आहे’, हे लक्षात येते.

३. सईद अन्वर यानेही ट्वीट करत म्हटले की, सर्व आंतरराष्ट्रीय संघ आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पाकिस्तान दौर्‍यावर येतात; मग बी.सी.सी.आय.ला काय समस्या आहे ? जर बी.सी.सी.आय. आशिया चषक स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळवण्याची मागणी करत असेल, पुढील वर्षी भारतात होणारी विश्‍चषक स्पर्धाही तटस्थ ठिकाणी खेळवण्यात यावी.

संपादकीय भूमिका

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अभिनंदनीय निर्णय ! भारताने पाकिस्तावर राजनैतिक बहिष्कारच घालण्याची आवश्यकता आहे. त्याच्याशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवण्याची आवश्यकता नाही !