रामायणावरून केलेले आक्षेपार्ह विधान काँग्रेसचे केरळ प्रदेशाध्यक्ष के. सुधाकरन् यांनी मागे घेतले !

कोझिकोड (केरळ) – केरळचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष के. सुधाकरन् यांनी रामायणावर केलेल्या एका आक्षेपार्ह विधानावरून खेद व्यक्त करत विधान मागे घेतले. सुधाकरन् यांच्यावर या विधानावरून टीका केली जात होती.

१. सुधाकरन् यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांना प्रश्‍न विचारण्यात आला होता. ‘मलबार क्षेत्रातील लोक आणि मध्य केरळमधील राजकीय नेते हे किती वेगळे आहेत ?’, या प्रश्‍नावर सुधाकरन् यांनी उत्तर देतांना म्हटले, ‘भगवान श्रीराम रावणाचा वध करून  लंकेतून अयोध्येत परत असतांना लक्ष्मणाच्या मनामध्ये भगवान श्रीरामाला समुद्रात ढकलून त्यांची पत्नी सीतामातेला समवेत घेऊन जाण्याचे विचार येत होते. जेव्हा ते मध्य केरळ येथे पोचले, तेव्हा त्यांच्या मनातील विचार निघून गेले. भगवान श्रीरामाला लक्ष्मणाच्या मनातील विचार लक्षात आले होते. त्यांनी लक्ष्मणाला सांगितले की, ही त्याची चूक नाही, तर या भूमीमुळे (दक्षिण केरळमुळे) असे झाले.

२. या विधानामुळे सुधारकरन् यांच्यावर भाजप आणि अन्य पक्षांचे नेते यांनी टीका केल्यानंतर सुधाकरन् यांनी खेद व्यक्त करत विधान मागे घेतले. ते म्हणाले की, मी ही गोष्ट लहानपणी ऐकली होती, ती मी सांगितली. माझा हेतू लोकांमध्ये फूट पाडण्याचा किंवा कुणाला हीन लेखण्याचा नव्हता.

संपादकीय भूमिका

वारंवार हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या काँग्रेसवाल्यांना आता हिंदूंनीच मतपेटीद्वारे धडा शिकवावा !