रायगड जिल्ह्यातील महाड येथील साधकांनी आपत्काळाची अनुभवलेली भयावह स्थिती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली कृपा !

साधकांनी आपत्काळाच्या वेळी अनुभवलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेच्या संदर्भातील काही भाग १७.१०.२२ या दिवशी पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/620698.html

२. सौ. भारती प्रदीप वाळणुसकर, बिरवाडी, महाड, जिल्हा रायगड.

२ अ. साधिकेची सदनिका दुसर्‍या माळ्यावर असल्यामुळे पुरापासून रक्षण होणे : ‘आमची सदनिका दुसर्‍या माळ्यावर आहे. तळमजल्यावर कमरेइतके पुराचे पाणी आले होते; मात्र आम्हाला पुराच्या पाण्याचा फटका बसला नाही. आमची इमारत येथील ‘काळ’ या नदीपासून पुष्कळ दूर आहे, तरीही पुराचे पाणी आमच्या इमारतीच्या तळमजल्यावर कमरेपर्यंत आले होते.

२ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आधी सतर्क केल्यानुसार आपत्काळाच्या दृष्टीने आधीच घरातील आवश्यक सर्व ती पुरेशी सिद्धता करून घेणे : मी घरी लाडू, पापड, बटाटा वेफर्स, बुंदी, गोड आणि आंबट लोणची उन्हाळ्यातच सिद्ध करून ठेवली होती. त्याच समवेत मी महापुराच्या आधी ४ – ५ दिवस सर्व प्रकारच्या डाळी, गहू, तांदूळ, ज्वारी, नाचणी, थालीपिठाची भाजणी, मेणबत्त्या इत्यादी सर्व किराणा सामान घरी आणून ठेवले होते. गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुदेवांनीच मला पेठेतून सर्व सामान खरेदी करण्याची बुद्धी दिली होती. त्यामुळेच मला तळमजल्यावर रहाणार्‍या कुटुंबाच्या जेवणाची सोयही करता आली.

‘आपत्काळ येण्याआधीच गुरुदेवांनी आमच्याकडून पुरेशी सिद्धता करून घेतली आणि स्थिर राहून परिस्थितीला तोंड द्यायला शिकवले’, त्यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता !’

३. श्री. सुदेश पालशेतकर, महाड, जिल्हा रायगड.

३ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी येणार्‍या आपत्कालीन परिस्थितीची अगोदरच जाणीव करून दिल्यामुळे स्थिर रहाता येणे : ‘२१.७.२०२१ या दिवशी रात्री महाड आणि पोलादपूर तालुक्यांत मोठ्या प्रमाणात पाऊस चालू झाला अन् पूर परिस्थिती निर्माण झाली. वीज, पाणी, दळणवळण यंत्रणा, दूरभाष संपर्क यंत्रणा संपूर्णपणे बंद झाल्या. सर्व जनजीवन विस्कळीत झाले, तरी प.पू. गुरुदेवांच्या कृपेने आम्हाला या परिस्थितीतही स्थिर रहाता आले. समाजातील सर्व लोक या परिस्थितीसमोर हतबल झाले होते; परंतु गुरुदेवांनी सर्व साधकांना सुखरूप ठेवले होते. गुरुदेवांनी येणार्‍या आपत्कालीन परिस्थितीची अगोदरच जाणीव करून दिली होती. त्यामुळे माझ्याकडून पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.

३ आ. पूरग्रस्तांना आलेले साहाय्य योग्य व्यक्तींकडे न पोचता अयोग्य ठिकाणी जाणे, तेव्हा ‘समाजात धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे ?’, याची जाणीव होणे : पूर ओसरल्यावर सर्व ठिकाणांहून महाड आणि पोलादपूर तालुक्यांतील पूरग्रस्तांसाठी धान्य, वस्तू, कपडे, पाणी अशा स्वरूपात साहाय्य मिळू लागले; परंतु ते साहाय्य पूरग्रस्तापर्यंत न पोचता समाजातील दुसरेच लोक घेऊन जात होते. ‘कुठल्या व्यक्तींना साहाय्य आवश्यक आहे ?’, याचे नियोजन नसल्यामुळे ज्यांना आवश्यकता आहे, त्यांना ते न मिळता काही जण ते स्वतःच्या घरात घेऊन जात होते. काही लोक साहाय्य घेऊन येणार्‍या गाड्या दमदाटी करून अडवत होते आणि स्वतःच ते साहित्य घेत होते. तेव्हा ‘समाज किती अधर्माने वागत आहे’, याची जाणीव होऊन ‘समाजाला धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे’, हे लक्षात येऊ आले.

या परिस्थितीत देवाने विष्णुस्वरूप गुरुमाऊलीच्या छत्रछायेखाली मला सुखरूप ठेवले आणि ‘आपत्काळात साधनेच्या बळावर स्थिर राहून परिस्थितीवर मात कशी करायची ?’, हे शिकवले. त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’ (२५.९.२०२१)

(समाप्त)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक