आम्ही तैवान आमचा मानतो आणि तो आमच्यामध्ये सामील करू ! – शी जिनपिंग

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग

बीजिंग (चीन) – तैवानच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी आणि त्यात अन्य देशांचा हस्तक्षेप नाकारण्यासाठी आम्ही कठोर पावले उचलली आहेत. आम्ही तैवान आमचा मानतो आणि तो आमच्यामध्ये सामील करू, असे विधान चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी येथे केले. ते चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या २० व्या अधिवेशनामध्ये बोलत होते. हे अधिवेशन १६ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. यात देशाचे नेतृत्व पुन्हा एकदा शी जिनपिंग यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे.

जिनपिंग या वेळी म्हणाले की,

१. आमच्याकडे जगातील सर्वांत मोठ्या शैक्षणिक आणि आरोग्य सुविधा आहेत. कोविडच्या काळात आम्ही लोकांच्या सुरक्षिततेचे आणि आरोग्याचे सर्वोच्च पातळीवर रक्षण केले आहे. महामारीच्या काळात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांचे प्राण वाचवणे होय.

२. चीनच्या सुरक्षेसाठी पर्वत आणि नद्या यांचे जतन करणे आवश्यक आहे. त्यांच्या रक्षणासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत. चीनच्या सुरक्षेसाठी सैन्य अधिक सशक्त करण्यात आले आहे. सैन्यावर पक्षाचे नेतृत्व पूर्णपणे स्थापित करण्यासाठी, आम्ही मूलभूत पालट केले आहेत, ज्याचे चांगले परिणाम दिसत आहेत. हाँगकाँगमध्ये पूर्वी अराजकता असायची; पण आता ते पूर्णपणे चीनच्या नियंत्रणात आहे, असा दावाही जिनपिंग यांनी केला.

३. मानवी इतिहासातील गरिबीविरुद्धची सर्वांत मोठी आणि प्रदीर्घ लढाई चीनने लढली आहे. जगभरातील गरिबी न्यून करण्यासाठी आमचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत.

चीनची ‘झीरो कोविड पॉलिसी’ कायम रहाणार !

कोरोना विषाणूवर आळा घालण्यासाठी चीन सरकारने बनवलेल्या विवादास्पद ‘झीरो कोविड पॉलिसी’मध्ये भविष्यात कोणताही पालट करण्यात येणार नाही, असे सुतोवाच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी केले आहे. कोरोनावर अटकाव घालण्यासाठी राबवण्यात आलेल्या कठोर निर्बंधांचा आता मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला आहे. अशातच या बैठकीचे आयोजन झाल्याने त्या विरोधात दोन दिवसांपूर्वी बीजिंग शहरात अनेक फलक झळकले होते. त्यांवर जिनपिंग यांना विरोध दर्शवण्यात आला होता आणि त्यांना राष्ट्राध्यक्षपदावरून पायउतार करण्याची मागणी करण्यात आली होती.