गोवा : आईने भ्रमणभाष संच वापरण्यास रोखल्याने १३ वर्षीय मुलीने २ वेळा केला आत्महत्येचा प्रयत्न !

(प्रतिकात्मक चित्र)

पणजी, १५ ऑक्टोबर (वार्ता.) – आईने भ्रमणभाष संच वापरण्यास मनाई केल्याने एका १३ वर्षीय मुलीने २ वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित मुलीवर सध्या म्हापसा येथील आझिलो रुग्णालयात उपचार चालू आहेत.

या मुलीला भ्रमणभाष संच वापरण्याचे व्यसन जडले होते. मुलीला भ्रमणभाष संच वापरण्यास आईन मनाई केल्याने रागाने संबंधित मुलीने घराच्या गच्चीवर जाऊन ‘ब्लेड’च्या साहाय्याने मनगटावर घाव करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर मुलीला त्वरित उपचारार्थ हळदोणा प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. मुलीवर प्राथमिक उपचार केल्यावर तिला घरी जाऊ देण्यात आले; मात्र काही घंट्यांनंतर संबंधित मुलीने पुन्हा स्वत:च्या जिवाला हानी पोचवण्याचा प्रयत्न केला. यानंतर पालकांनी संबंधित मुलीला घायाळ अवस्थेत त्वरित पुन्हा एका प्रथम हळदोणा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नंतर आझिलो जिल्हा रुग्णालयात भरती केले. यानंतर संबंधित मुलीने एका अशासकीय संघटनेच्या उपस्थितीत पोलिसांना दिलेल्या साक्षीमध्ये ‘आईने मित्रांना संपर्क करण्यासाठी भ्रमणभाष संच वापरण्यास दिला नाही. त्यामुळे मला राग आला आणि यामुळे मी माझ्या शरिराला हानी केली’, असे सांगितले. पोलीस सूत्रांनी घटनेला पुष्टी दिली आहे.
पोलीस उपअधीक्षक जीवबा दळवी म्हणाले, ‘‘पोलिसांनी संबंधित मुलीची साक्ष नोंद करून घेतली आहे; मात्र संबंधित मुलीची कार्यकारी जिल्हाधिकार्‍यांकडे पुन्हा साक्ष नोंदवून घेतली जाणार आहे.’’

संपादकीय भूमिका

  • आधुनिक तंत्रज्ञानासमवेत साधना न शिकवल्याने अशा घटना घडत आहेत ! यातून केवळ भौतिक विकास आणि शिक्षण न देता मुलांना ‘जीवन कसे जगायचे ?’, याचे शिक्षण देणे, त्यांचे आत्मबल वाढवणे या गोष्टी अनिवार्य आहेत, हे लक्षात येते.
  • कित्येक मुलांना भ्रमणभाषचे एवढे व्यसन असते की, ते जेवणाकडेही दुर्लक्ष करतात !
  • या समस्येसाठी केवळ पालकांना दोषी धरून चालणार नाही, शासनानेही ही सामाजिक समस्या ठरवून ठोस उपाययोजना काढावी !