‘जागतिक भूक निर्देशांका’त भारत १०१व्या स्थानावरून १०७ वर !

श्रीलंका, पाकिस्तान आणि नेपाळ यांची स्थिती भारतापेक्षा चांगली !  

नवी देहली – जागतिक भूक निर्देशांकाच्या सूचीमध्ये भारताची १०१व्या क्रमांकावरून १०७व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यापेक्षाही भारताची स्थिती वाईट असल्याचे यात म्हटले गेले आहे. वर्ष २०२१मध्ये घोषित झालेल्या आकडेवारीनुसार या सूचीमध्ये भारत १०१व्या स्थानावर होता. यावर्षीच्या आकडेवारीनुसार १२१ देशांमध्ये आता भारत १०७ व्या स्थानावर आहे. भारताच्या आधी नेपाळ (८१), पाकिस्तान (९९), श्रीलंका (६४) आणि बांगलादेश (८४) या शेजारी देशांची क्रमवारी लागते. सर्वांत तळाला म्हणजेच १२१व्या स्थानी येमेन आहे, तर सर्वांत वर असणार्‍या देशांमध्ये चीन आणि कुवेत या आशिया खंडातील देशांचा समावेश आहे. युरोप खंडातील देशांचा वरच्या स्थानी क्रमांक लागला आहे.

निर्देशांक कसा काढतात ?

‘कन्सर्न वर्ल्डवाईड’ आणि ‘वेल्थ हंगर लाईफ’ या संस्थांकडून संयुक्तपणे प्रतिवर्षी ही सूची घोषित केली जाते. संबंधित देशामध्ये उपाशीपोटी रहाणार्‍या लोकांच्या आकडेवारीवरून भूकेची तीव्रता किती आहे, या निकषावर त्या त्या देशांचे मूल्यांकन केले जाते. त्यानुसार मानांकन करण्यात येते. भारताला या निकषांवर २९.१ इतके मानांकन  मिळाल्यामुळे भारताची घसरण झाली. ९.९ पेक्षा अल्प मानांकन असल्यास त्या देशातील परिस्थिती चांगली मानली जाते. हे मानांकन १० ते १९.९ पर्यंत असल्यास परिस्थिती बरी मानली जाते. २० ते ३४.९ असे असल्याचे गंभीर, ३५ ते ४९.९ असल्यास चिंताजनक आणि ५० च्या वर असल्यास परिस्थिती भीषण असल्याचे मानले जाते.

संपादकीय भूमिका

  • कोरोनाच्या काळात श्रीलंकेचे आर्थिक कंबरडे मोडले, तर पाकचे मागील काही वर्षांत आर्थिक दिवाळे वाजले आहे. असे असतांना भूक निर्देशांकात या देशांची स्थिती भारतापेक्षा चांगली कशी ? त्यामुळे या अहवालाविषयी भारतियांच्या मनात साशंकता आहे !
  • या अहवालाविषयी सत्यता पडताळून ‘भारतातील लोक खरंच किती प्रमाणात उपाशी आहेत’, याचा अहवाल सरकारने सादर करणे आवश्यक !