सांखळी, १४ ऑक्टोबर (वार्ता.) – सांखळी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जाऊन हिरवा झेंडा फडकावणार्या मुसलमान युवकाला संतप्त शिवप्रेमींनी धडा शिकवला. संबंधित युवकाला संतप्त शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन क्षमा मागण्यास भाग पाडले. त्याचप्रमाणे २ धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने संबंधित युवकासंबंधी पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे.
२ ऑक्टोबर या दिवशी हिंदूंनी दसरा सण साजरा केला आणि त्याच दिवशी मुसलमानांनी ‘ईद-ए-मिलाद’ साजरा केला. याच दिवशी सांखळी येथे ‘उरूस’ साजरा करण्यात आला. या वेळी एका मुसलमान युवकाने सांखळी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर जाऊन उंच काठीवर हिरवा झेंडा फडकावला. रस्त्यावर वाहतूक चालू असतांना हा युवक रस्त्याच्या मधोमध उभा राहून हिरवा झेंडा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ फडकावत होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उंचावर भगवा झेंडा लावलेला आहे. या घटनेचे चलचित्र (व्हिडिओ) सामाजिक माध्यमात प्रसारित झाल्यानंतर मुसलमान युवक हिरवा झेंडा फडकावून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करत असल्याने सांखळी येथील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. संतप्त शिवप्रेमी युवकांनी संबंधित युवकाला शोधून काढून त्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आणून सर्वांसमक्ष गुडघ्यावर वाकून क्षमा मागण्यास भाग पाडले. ‘गोव्यात हिंदू-मुसलमान अशी धार्मिक तेढ निर्माण करायची आहे का?’, असा प्रश्न संतप्त नागरिकांनी त्याला विचारला.