मुंबईच्या सुशोभिकरण प्रकल्पाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मान्यता !

मुंबई – मुंबई सुशोभिकरण प्रकल्प आराखड्याला मुख्यमंत्र्यांनी नुकतीच मान्यता दिली आहे. सुशोभिकरण प्रकल्पाच्या अंतर्गत रस्ते, पूल, पदपथ, वाहतूक बेटे, समुद्रकिनारे, उद्याने इत्यादी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, सुधारणा आणि आकर्षक प्रकाशयोजना या प्रमुख पालटांसह एकूण १६ विविध प्रकारची कामे केली जाणार आहेत. डिसेंबर २०२२ पर्यंत किमान ५० टक्के आणि मार्च २०२३ पर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शौचालय सुविधा, मियावाकी वृक्ष लागवड, गेट वे ऑफ इंडिया परिसराचे सुशोभिकरण, उद्याने आणि वाहतूक बेटांचे सुशोभिकरण ही कामेही या अंतर्गत आहेत.

एकूण प्रकल्पात १ सहस्र ७२९ कोटी रुपये खर्च येणार आहे. गडांवरील रोषणाईसाठी २५ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. १५ कोटी रुपयांची स्वच्छतेसाठी यांत्रिक उपकरणे घेण्यात येणार आहेत.

विविध ठिकाणच्या प्रकाशयोजनांवर भर

सुशोभिकरणाच्या कामांमध्ये रोषणाईवर अधिक भर दिला जाणार आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत रस्ते, पूल, आकाशमार्गिका, समुद्रकिनारे या ठिकाणी कायमस्वरूपी मोठ्या प्रमाणात दिवे लावण्यात येणार आहेत. समुद्रकिनार्‍यांवर होलोग्राम, तसेच लेझर रोषणाई करण्यात येणार आहे.