‘मनुष्य गौरवदिना’निमित्त (१९ ऑक्टोबर) स्वाध्याय परिवाराचा भक्तीफेरी सप्ताह

स्वाध्याय परिवाराचे पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले, म्हणजेच दादाजींचा १९ ऑक्टोबर हा जन्मदिन ‘मनुष्य गौरवदिन’ म्हणून गेली कित्येक वर्षे साजरा होत आहे. वर्ष २०२० हे दादाजींचे जन्मशताब्दी वर्ष होते; परंतु मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे प्रचंड उत्साह आणि आनंद असूनही दादाजींचे जन्मशताब्दी वर्ष स्वाध्याय परिवाराला मोठ्या प्रमाणावर साजरे करता आले नाही.

भक्तीफेरी सप्ताहाचे आयोजन

या वर्षी १९ ऑक्टोबर या दादांच्या जन्मदिनी, म्हणजे ‘मनुष्य गौरवदिना’निमित्त १३ ते १८ ऑक्टोबर २०२२ असे सलग ६ दिवस भारतातील १६ राज्यांमधून दीड लाख सदस्य हे भारतातील विविध गावे आणि शहरे येथे भक्तीफेरी काढणार आहेत. या माध्यमातून स्थानिक परिवारांशी आणि नागरिकांशी संपर्क साधून एक ईश्वरधिष्ठीत तरल भावसंबंध बांधण्याचा प्रयत्न या भक्तीफेरीच्या माध्यमातून करणार आहेत.

गावोगावी मार्गदर्शन

स्वाध्याय परिवाराला मिळालेला ‘जीव, जगत आणि जगदीश यांच्याकडे बघण्याचा भक्तीपूर्ण दृष्टीकोन’ हा त्यांचा पाठ पक्का करण्यासाठी परिवारातील सदस्य गावोगावी जात आहेत. परिवाराच्या वरील दृष्टीकोनाविषयी प्रवचनांतून, वेगवेगळ्या बैठकांमधून मार्गदर्शन केले जाणार आहे.

कृती-भक्तीच्या माध्यमातून अभिवादन

पूर्णावतार योगेश्वर कृष्ण आणि भगवद्गीता यांचे महान उपासक असलेले पूजनीय दादा, जीवनभर संस्कृतीच्या जीर्णोद्धारासाठी आणि अखिल मानवी जीवनाच्या गौरवासाठी अन् दैवी उत्थानासाठी जगाच्या कानाकोपर्‍यात धावत राहिले. अशा या महान कर्मयोगी, ज्ञानी भक्ताचा, म्हणजेच पूजनीय दादाजींचा जन्मदिवस स्वाध्याय परिवारातील सदस्य दादांना अभिप्रेत अशा कृती-भक्तीच्या माध्यमातून अभिवादन करून साजरा करत आहेत, हे या २१ व्या शतकातील वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.

खरी तीर्थयात्रा

१९ ऑक्टोबर या दिवशी परिवारातील सर्व सदस्य हे जिल्ह्यामधील एखाद्या तीर्थक्षेत्री एकत्र जमून दादांना अभिवादन करून या तीर्थयात्रेची सांगता करतील. इतर लोकांप्रमाणे ही परतीचे तिकीट काढून देवदर्शनाची हौस भागवणारी पर्यटन सहल किंवा तीर्थयात्रा, अशी ही तीर्थयात्रा नसेल, तर देवासाठी स्वतःचा वेळ काढून, निःस्वार्थ आणि निरपेक्ष भावाने एक दैवी मातृभाव निर्माण करण्यासाठी, गावागावांमध्ये भगवंताच्या लेकरांना भेटून विचार अन् एकमेकांचा आधार घेऊन तीर्थक्षेत्री भेटणे, ही खरी तीर्थयात्रा असेल.

दीदींच्या मार्गदर्शनाखाली भक्तीफेरी सप्ताहाचे आयोजन

स्वाध्याय परिवाराचे सगळे उपक्रम दादाजींची सुपुत्री दीदी, म्हणजेच धनश्री आठवले तळवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत. मागील काही वर्र्षांपासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाध्याय परिवार त्रिकाल संध्येचे व्रत घेऊन संस्कृतीपासून तुटलेल्या, मूळ प्रवाहापासून बाजूला झालेल्या लोकांकडे भक्तीफेरीच्या माध्यमातून संपर्क साधून त्यांना पुन्हा आपल्या संस्कृतीच्या मूळ प्रवाहाशी जोडण्याचे काम पुष्कळ मोठ्या प्रमाणात करत आहेत.