बेट द्वारकावरील अवैध थडगी, मशिदी आदी बांधण्‍यामागे भारताच्‍या सुरक्षेला धोका निर्माण करण्‍याचे होते षड्‍यंत्र !

द्वारका (गुजरात) – गुजरातमध्‍ये पाकिस्‍तानच्‍या सीमेजवळ असलेल्‍या द्वारकेतील बेट द्वारकेवर अतिक्रमण करून भारताच्‍या सुरक्षेला धोका निर्माण करण्‍याचे मोठे षड्‌यंत्र उघड झाल्‍यानंतर येथे मुसलमानांनी अवैधरित्‍या बांधलेली थडगी, मशिदी आदी नुकतेच पाडण्‍यात आली. या बेटावर जाण्‍यासाठी नौकेचे साहाय्‍य घ्‍यावे लागते. बेट द्वारका हीच भगवान श्रीकृष्‍णाची द्वारका असल्‍याचे म्‍हटले जाते. ‘येथे श्रीकृष्‍णाचे घर होते. सुदामा याच बेटावर भगवान श्रीकृष्‍णाला भेटण्‍यास गेला होता’, असे सांगितले जाते.

बेट द्वारका आणि कराची यांच्‍यामधील अंतर अनुमाने १८५ ‘नॉटिकल मैल’, म्‍हणजेच अनुमाने ३४२ किमी आहे. ‘येथे मुसलमानांकडून अवैधरित्‍या बांधण्‍यात आलेली धार्मिक स्‍थळे जिहादी आतंकवाद्यांसाठी आश्रयस्‍थान ठरली असती. संधी मिळताच हे आतंकवादी भारतातील विविध भागांत आक्रमणेही करू शकतात,’ अशी भीती सुरक्षायंत्रणांना होती. तटरक्षक दलाच्‍या ठाण्‍यासमोर अनेक अवैध बांधकामे करण्‍यात आली होती. येथे रहाणारे लोक भारतीय सैन्‍याच्‍या हालचालींवर लक्ष ठेवून होते. यामुळेच प्रशासनाकडून येथील बांधकामांवर कारवाई करण्‍यात आली. आता गुप्‍तचर यंत्रणा या बांधकामामागे कोण होते ?, याचा शोध घेत आहे.

संपादकीय भूमिका

  • भारताच्‍या सुरक्षेच्‍या दृष्‍टीने महत्त्वाच्‍या असणार्‍या बेट द्वारकेवर अशा प्रकारची अवैध बांधकामे चालू असेपर्यंत गुप्‍तचर, प्रशासन आणि पोलीस झोपले होते का ? जर या काळात खरोखर एखादा घातपात झाला असता, तर त्‍याला कोण उत्तरदायी असते ? या सर्व प्रकाराची चौकशी झाली पाहिजे !