राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे बेपत्ता !

निरा नदीपात्रात शोध चालू

शशिकांत घोरपडे

पुणे – महाराष्ट्र राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे हे १२ ऑक्टोबरपासून बेपत्ता असून नीरा नदी आणि परिसरात त्यांचा शोध घेण्यात येत आहे. त्यांच्या भ्रमणभाषचे शेवटचे ‘लोकेशन’ सारोळा, ता. भोर, जवळील नीरा नदी पुलावर आढळल्याने त्यांच्या नातेवाइकांनी शिरवळ पोलीस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता होण्याची माहिती दिली. भोर येथील भोईराज जल आपत्ती निवारण पथक, महाबळेश्वर ट्रेकर्स, सातारा पोलीस आणि राजगड पोलीस यांनी युद्ध पातळीवर शोधमोहीम चालू केली आहे.

शशिकांत घोरपडे हे १२ ऑक्टोबरला दुपारी साडेतीन वाजता त्यांच्या पुणे येथील कार्यालयातून मित्राच्या गाडीतून निघाले; मात्र घरी आले नाहीत म्हणून त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाइक यांनी शोध चालू केला. त्यांच्या मित्राची गाडी पुलाजवळच्या हॉटेलसमोर सापडली असल्याने, त्यानुसार घोरपडे यांचे बंधू श्रीकांत घोरपडे यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात बेपत्ता होण्याची तक्रार प्रविष्ट केली आहे.