कर्नाटकमधील हिजाब बंदीचे प्रकरण आता सरन्यायाधिशांकडे !

नवी देहली – कर्नाटकच्या शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्यावरील बंदीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट केलेल्या आव्हान याचिकेवर निकाल देतांना दोन न्यायाधिशांची वेगवेगळी मते आली. त्यामुळे हे प्रकरण आता सरन्यायाधिशांकडे पाठवण्यात आले आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाबवरील बंदीला योग्य ठरवल्याने याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

१. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि सुधांशू धुलिया यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली होती. त्यावर निर्णय देतांना न्या. गुप्ता यांनी बंदीच्या समर्थनार्थ, तर न्या. धुलिया यांनी विरोधात मत व्यक्त केले. त्यामुळे त्यांनी हे प्रकरण सरन्यायाधिशांकडे पाठवले आहे. ‘कदाचित् हे प्रकरण घटनापिठाकडे पाठवले जाऊ शकते’, असेही म्हटले जात आहे.

२. १५ मार्च या दिवशी कर्नाटक उच्च न्यायालयाने ‘सरकारी प्री-युनिव्हर्सिटी गर्ल्स कॉलेज, उडुपी’च्या काही मुसलमान विद्यार्थिनींनी वर्गात हिजाब घालण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती. न्यायालयाने म्हटले होते, ‘हिजाब घालणे, हा इस्लामच्या अनिवार्य प्रथेचा भाग नाही. घटनेच्या कलम २५ नुसार त्याला संरक्षण देण्याची आवश्यकता नाही.’ न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देत काही मुलींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती, त्यावर हा निर्णय आला आहे.

(हिजाब म्हणजे मुसलमान महिलेने डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र)