आतंकवाद्यांशी लढतांना २ गोळ्‍या लागूूनही मागे न हटणारा भारतीय सैन्‍याचा ‘झूम’ नावाचा श्‍वान !

घायाळ झालेल्‍या झूमवर सैन्‍य रुग्‍णालयात उपचार चालू

भारतीय सैन्‍याचा ‘झूम’ नावाचा श्‍वान

अनंतनाग (जम्‍मू-काश्‍मीर) – येथील कोकरनाग परिसरात जिहादी आतंकवाद्यांशी झालेल्‍या चकमकीत भारतीय सैन्‍याचा ‘झूम’ नावाचा एक श्‍वान घायाळ झाला. २ गोळ्‍या लागल्‍यानंतरही तो आतंकवाद्यांशी लढत राहिला. त्‍याच्‍यावर सध्‍या श्रीनगरमधील सैन्‍याच्‍या रुग्‍णालयात उपचार चालू आहेत. आता झूमची प्रकृती स्‍थिर आहे.

झूम याला आतंकवाद्यांचा शोध घेण्‍यासाठी आणि त्‍यांना पकडण्‍यासाठी प्रशिक्षित करण्‍यात आलेले आहे. झूम सैन्‍याच्‍या अनेक मोहिमांमध्‍ये सहभागी होत असतो. कोकरनाग येथील कारवाईच्‍या वेळी झूमवर जिथे आतंकवादी लपले होते, ते घर रिकामे करण्‍याचे दायित्‍व सोपवण्‍यात आले. झूमने आतंकवाद्यांना ओळखले आणि त्‍यांच्‍यावर आक्रमण केले. त्‍या वेळी आतंकवाद्यांनी त्‍याच्‍यावर गोळीबार केला. यात त्‍याला २ गोळ्‍या लागल्‍या. असे असतांनाही त्‍याने त्‍याचे काम चालू ठेवले. त्‍यानंतर सैन्‍याने येथे २ आतंकवाद्यांना ठार मारले.