सरकार जेव्हा भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई करते तेव्हा विरोधक ओरडतात !

पंतप्रधान मोदी यांची काँग्रेसवर टीका 

पंतप्रधान नरेंद्र मोदी

राजकोट (गुजरात) – सरकार जेव्हा भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई करते, तेव्हा एक गट आमच्या विरोधात ओरडतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्ष काँग्रेसवर टीका करतांना म्हणाले. राजकोटमधील जमकंदोरना येथे एका जाहीर सभेला संबोधित करतांना ते बोलत होते. ‘भूमीपुत्र सरदार पटेल यांचा आदर न करणार्‍यांना गुजरातमध्ये स्थान असता कामा नये’, असेही मोदी पुढे म्हणाले. (‘पंतप्रधानांनी भारत भ्रष्टाचारमुक्त करावा’, हीच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे ! – संपादक)

भाजप सरकारने बेट द्वारका अतिक्रमणातून मुक्त केले – पंतप्रधान

गुजरातचा सागरी पट्टा अतिक्रमणामुळे उद्ध्वस्त झाला होता. बेट द्वारकेची ओळख पालटली होती. मुख्यमंत्री भूपेंद्रभाई यांनी रातोरात बेट द्वारका अतिक्रमणमुक्त केली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

गुजरातमध्ये अभियांत्रिकी आणि ‘एम्.बी.ए.’ यांच्या महाविद्यालयांत वाढ – पंतप्रधान

गुजरातमध्ये आज १३० अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत, तसेच १००हून अधिक ‘एम्.बी.ए.’ची महाविद्यालये आहेत. डॉक्टर होण्याच्या मार्गात इंग्रजी आता अडसर ठरणार नाही. आमची मुले आता मातृभाषेतून वैद्यकीय शिक्षण घेऊ शकतात, असेही पंतप्रधान मोदी या वेळी म्हणाले.