नुकताच ‘ब्रह्मास्त्र’ हा हिंदी भाषेतील चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट पौराणिक आणि काल्पनिक कथा यांचे मिश्रण आहे. खरेतर ‘ब्रह्मास्त्र’ हे नाव हिंदूंना नवीन नाही. रामायण महाभारतात अनेक प्रकारची शस्त्रे आणि अस्त्रे सांगितली आहेत. मंत्रांच्या बळावर अस्त्रे वापरली जातात. त्यांच्यामुळे मोठा विनाश होतो. सर्वांत शक्तीशाली अस्त्र होते ब्रह्मास्त्र ! याखेरीज पाशुपतस्त्र, आग्नेयास्त्र, गरुडास्त्र, नारायणास्त्र, वायव्यास्त्र, पर्जन्यास्त्र इत्यादीही विनाशाची अस्त्रे होती. पौराणिक ग्रंथांपासून ते विज्ञान संशोधनापर्यंत ब्रह्मास्त्राचा उल्लेख आढळतो. अमेरिकेतील ‘ट्रिनिटी रिसर्च’ने वर्ष १९४५ मध्ये महाभारताविषयी लिहिले आहे, ‘महाभारत युद्धामध्ये झालेल्या विध्वंसामागे ब्रह्मास्त्र होते. त्यामध्ये अणूबाँबसारखी विध्वंसक शक्ती होती.’
ब्रह्मास्त्राविषयी रामायण, महाभारत या ग्रंथांव्यतिरिक्त ‘अहिर्बुध्य संहिते’त या अस्त्राचे अचूक वर्णन आढळते. या अस्त्राविषयी महाभारतकालीन शस्त्रास्त्रांवर संशोधन करणारे भारतीय लष्कराचे निवृत्त मेजर जनरल जी.डी. बक्षी आणि ज्योतिषी अन् कथाकार पंडित मनीष शर्मा यांनी केलेले विश्लेषण येथे देत आहोत.
१. ‘अहिर्बुध्य संहिते’मध्ये ब्रह्मास्त्राविषयी सांगितलेली महती
अहिर्बुध्य संहितेच्या अध्याय ३४ मध्ये श्लोक क्रमांक ५ ते ८ यांमध्ये ब्रह्मास्त्राचा उल्लेख आढळतो. त्यामध्ये म्हटले आहे, ‘ब्रह्मास्त्राचा निश्चित आकार नव्हता. ते मंत्रांच्या शक्तीने सक्रीय व्हायचे. ते सोडल्यानंतर संपूर्ण जगात आग पसरायची, आकाशातून उल्का पडायच्या, संपूर्ण वातावरणात हलाहल विष पसरायचे, जोरदार वारे वहायचे, पृथ्वीवर महापूर येत होता. पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश ही पंचतत्त्वे संहारक व्हायची.
२. मेजर जनरल जी.डी. बक्षी यांनी ब्रह्मास्त्राविषयी सांगितलेली विशेष संशोधनात्मक माहिती
२ अ. ब्रह्मास्त्राचा परिणाम अणूबाँबसारखाच असणे : (निवृत्त) मेजर जनरल जी.डी. बक्षी म्हणतात, ‘‘अमेरिकन शास्त्रज्ञ जे. रॉबर्ट ओपेनहायमर हे अणूबाँबचे जनक म्हणून ओळखले जातात. ओपेनहायमर आणि त्यांच्या गटाने वर्ष १९४५ च्या सुमारास एक संशोधन केले होते, जे ‘ट्रिनिटी रिसर्च’ म्हणून ओळखले जाते. ट्रिनिटी रिसर्चमध्ये महाभारत आणि गीता यांची तथ्य तपासणी करण्यात आली. या संशोधनाचा निष्कर्ष असा होता की, महाभारताच्या वेळी अणूबाँबसारखी शक्ती वापरली गेली होती. बहुधा ते ब्रह्मास्त्र किंवा असे काही विध्वंसक शस्र असावे. ब्रह्मास्त्राच्या परिणामाचे वर्णन जसे महाभारतात आहे, तसाच परिणाम अणूबाँबचाही आहे.
महाभारताच्या वेळी ब्रह्मास्त्र होते. असे म्हटले जाते की, ते अण्वस्त्रासारखे होते; परंतु आजच्या काळात या शस्त्राविषयी अचूक माहिती नाही. ते कसे होते ? त्याचा आकार काय होता ? हे सांगणे कठीण आहे.’’
२ आ. महाभारत युद्धाचे एक कारण ब्रह्मास्त्र असणे
१. द्वापरयुगात धर्म आणि अधर्म यांच्यात कुरुक्षेत्रात युद्ध झाले होते, हे सर्वांना ठाऊक आहे; परंतु या युद्धामागे एक कारण होते ब्रह्मास्त्रासारखे दैवी शस्त्र !
२. त्या काळी अनेक लोकांकडे ब्रह्मास्त्र, नारायणास्त्र, पर्जन्यास्त्र, पशुपतास्त्र, अग्निस्त्र, गरुडास्त्र अशी संहारक शस्त्रे होती.
३. ही सर्व दैवी शस्त्रे आणि त्यांचा दुरुपयोग करणार्या लोकांचा नाश करण्यासाठी श्रीकृष्णाने महाभारत युद्ध केले होते.
४. या युद्धात दोन्ही बाजूंचे महान योद्धे एकमेकांशी लढतांना मारले गेले आणि त्यांच्यासह विनाशकारी दैवी शस्त्रेही नष्ट झाली.
अशा रितीने जग सुरक्षित रहावे; म्हणून श्रीकृष्णाने महाभारत युद्धातून सर्व दैवी शस्त्रे नष्ट केली.
३. महाभारताच्या युद्धामध्ये ब्रह्मास्त्र सोडल्यावर झालेले परिणाम
अ. महाभारताच्या ‘सौप्तिक पर्वा’मधील अध्याय १३ ते १५ मध्ये ब्रह्मास्त्राविषयी लिहिले आहे. अश्वत्थामाने पांडवांचा नाश करण्यासाठी ब्रह्मास्त्र सक्रीय केले होते. त्या वेळी सर्वत्र आग लागली होती. या आगीने सारे जग जाळून जाईल, असे वाटत होते.
आ. अश्वत्थामाचे ब्रह्मास्त्र थांबवण्यासाठी अर्जुनानेही ते सोडले. त्यामुळे दोन्ही ब्रह्मास्त्रांमधून अग्नीच्या प्रचंड ज्वाळा निघत होत्या.
इ. मोठमोठ्या उल्का आकाशातून तुटून पृथ्वीवर पडत होत्या. आकाशात आगही दिसत होती. पर्वत, वनस्पतींसह पृथ्वी थरथरत होती.
ई. अर्जुन अश्वत्थामाचे ब्रह्मास्त्र समोरासमोर आले, तेव्हा नारदमुनी आणि वेदव्यास तेथे प्रकट झाले अन् दोन्ही दैवी शस्त्रांच्या मध्ये उभे राहिले. कोणतेही शस्त्र नारदमुनी आणि वेदव्यास यांना ओलांडून पुढे जाऊ शकत नव्हते. या दोघांमुळे ब्रह्मास्त्र एकमेकांशी धडकू शकले नाही.
उ. त्यांनी अर्जुन आणि अश्वत्थामा यांना समजावून सांगितले, ‘जर या दोन ब्रह्मास्त्रांची टक्कर झाली, तर संपूर्ण जगाचा नाश होईल. आजपर्यंत ब्रह्मास्त्राचा असा वापर कुणी केलेला नाही. तुम्ही दोघांनी लगेच ते परत घ्यावे.
ऊ. अर्जुनाने त्याचे ब्रह्मास्त्र परत घेतले; पण अश्वत्थामाला त्याविषयी ज्ञान नव्हते. त्याने उत्तराच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडले. श्रीकृष्णाने आपल्या मायेने उत्तराच्या मुलाला त्या ब्रह्मास्त्रापासून वाचवले होते. पुढे या मुलाचे नाव ‘परीक्षित’ ठेवण्यात आले.
कथाकार आणि ज्योतिष पंडित मनीष शर्मा यांनी ‘ब्रह्मास्त्रा’विषयी सांगितलेली आध्यात्मिक माहिती
१. ब्रह्मास्त्र म्हणजे ब्रह्मदेवाचे शस्त्र. त्यात ब्रह्मदेवाची सर्व शक्ती होती. ब्रह्मास्त्राची निर्मिती ब्रह्मदेवाने केली, जेणेकरून देव आणि मानव यांसह जग सुरक्षित रहावे अन् राक्षसांना मारता येईल.
२. रामायण, महाभारत आणि अहिर्बुध्य संहिता यांमध्ये म्हटल्याप्रमाणे ब्रह्मास्त्राच्या वापराने जग नष्ट होऊ शकले असते. हे एवढे शक्तीशाली होते की, ज्या लक्ष्यावर सोडले जात होते, त्याला इतर कोणतीही शक्ती वाचवू शकत नव्हती.
३. प्रभु श्रीराम, लक्ष्मण, श्रीकृष्ण, भगवान परशुराम, द्रोणाचार्य आणि कर्ण यांना ब्रह्मास्त्र चालवण्याचे ज्ञान होते. श्रीराम, श्रीकृष्ण, भगवान परशुराम आणि द्रोणाचार्य यांना त्याची विनाशकारी शक्ती ठाऊक होती. त्यामुळेच त्यांनी ब्रह्मास्त्राचा वापर केला नाही.
४. प्रभु श्रीरामांनी लक्ष्मणाला ब्रह्मास्त्र चालवण्यापासून रोखले होते, तर कर्ण युद्धात ब्रह्मास्त्र वापरण्याचे ज्ञान विसरला होता.
– श्री. शशिकांत साळवी
४. ब्रह्मास्त्र कधी, कुणी आणि कुठे वापरले ?
४ अ. लक्ष्मणाने ब्रह्मास्त्र सोडण्याचा विचार करणे आणि प्रभु श्रीरामांनी त्याला नकार देणे : राम रावण युद्धाच्या वेळी लक्ष्मणाला ब्रह्मास्त्र वापरायचे होते. त्या वेळी प्रभु श्रीरामांनी लक्ष्मणाला नकार दिला. श्रीराम म्हणाले होते, ‘‘ब्रह्मास्त्र वापरणे सध्या योग्य नाही. त्याच्या वापराने संपूर्ण लंका नष्ट होईल.’’
४ आ. मेघनादाने सोडलेल्या ब्रह्मास्त्रामुळे लक्ष्मण बेशुद्ध होणे : राम रावण युद्धात रावणाचा मुलगा मेघनाद याने लक्ष्मणावर ब्रह्मास्त्र सोडले होते. लक्ष्मण हा शेषनागाचा अवतार होता. त्यामुळे त्यांनी ब्रह्मास्त्राचा आदर केला आणि त्याचे उत्तर दिले नाही. भगवंताचा अवतार असल्याने लक्ष्मण ब्रह्मास्त्राने मरण पावले नाहीत, ते फक्त बेशुद्ध झाले.
४ इ. वसिष्ठ मुनींच्या समोर ब्रह्मास्त्र निष्प्रभ ठरणे : एके दिवशी महर्षि विश्वामित्र वसिष्ठमुनींची ‘नंदिनी’ गाय घेण्यासाठी आले. वसिष्ठमुनींनी गाय देण्यास नकार दिल्यावर महर्षि विश्वामित्रांनी रागाने ब्रह्मास्त्र सोडले. वसिष्ठमुनी ब्रह्मर्षि होते; म्हणून त्यांच्या सन्मानार्थ ब्रह्मास्त्र निष्प्रभ झाले आणि ते परत गेले.
– श्री. शशिकांत साळवी
(साभार : दैनिक ‘दिव्य मराठी’)