‘भारत राष्‍ट्र समिती’ या पक्षाच्‍या फलकावरील भारताच्‍या मानचित्रात (नकाशात) जम्‍मू-काश्‍मीरचा भाग वगळला !

भाग्‍यनगर (तेलंगाणा) – तेलंगाणातील निझामाबादचे भाजपचे खासदार अरविंद धर्मपुरी यांनी ‘तेलंगाणाचे मुख्‍यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा नवा राष्‍ट्रीय पक्ष ‘भारत राष्‍ट्र समिती’च्‍या फलकावरील भारताच्‍या मानचित्रात (नकाशात) काश्‍मीरचा भाग वगळण्‍यात आल्‍याचे दाखवण्‍यात आले आहे’, असा आरोप केला आहे.

खासदार अरविंद धर्मपुरी यांनी पुढे म्‍हटले आहे, ‘‘भारतीय राज्‍यघटनेच्‍या कलम १ नुसार जम्‍मू-काश्‍मीर भारताचा भाग आहे; मात्र या फलकावर काश्‍मीरचा अर्धा भाग वगळण्‍यात आला आहे. यातून पाकचे समर्थन केले जात आहे. भारत राष्‍ट्र समिती निझामाचे अनुकरण करत आहे. हा निझाम त्‍या वेळच्‍या भाग्‍यनगर राज्‍याला पाकमध्‍ये विलीन करण्‍याचा प्रयत्न करणार होता. आता राष्‍ट्रीय पक्ष घोषित करण्‍यामागे चंद्रशेखर राव यांचा हाच उद्देश आहे का ?’’