हिंदुत्व तोडो यात्रा… !

सध्या काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ चालू आहे. या यात्रेत राहुल गांधी हे भारतविरोधी विधाने करणार्‍या पाद्रयाला भेटणे, पाकच्या समर्थनार्थ घोषणा देणार्‍या मुलीला भेटणे असे प्रकार करत आहेत. त्यामुळे ‘ही यात्रा भारत जोडो कि तोडो आहे ?’, असा प्रश्न जनतेला पडला आहे. बेंगळुरू येथे तर त्यांनी हद्दच केली. ‘संघाने ब्रिटिशांना साहाय्य केले आणि सावरकर ब्रिटिशांकडून मानधन घ्यायचे’, अशी धक्कादायक विधाने त्यांनी केली. राहुल गांधी यांची अनेक विधाने, भाषणे बुचकळ्यात टाकणारी आणि त्यांची वैचारिक उंची किती अल्प आहे, हे स्पष्ट करणारी असतात. अनेक वेळा भाषणे रटाळ, अज्ञान प्रदर्शित करणारी आणि विवेकशून्य असतात. त्यांच्या भाषणातून त्यांना नेमके काय म्हणायचे आहे ? हेच लोकांना कळत नाही.

हिंदुत्वाचे पाईक देशविरोधी ?


वीर सावरकरांचा अपमान करणे हे काँग्रेसचे खरे चरित्र !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी त्यांच्या मनात प्रत्येक काँग्रेसीप्रमाणे कमालीचा द्वेष आहे. ‘रा.स्व. संघाचा महात्मा गांधी यांच्या हत्येत सहभाग होता’, ‘मी क्षमा मागायला राहुल सावरकर नाही’, अशी अनेक संघ आणि सावरकर यांच्या विरोधात ते विधाने करतात. संघविरोधी विधानाविषयी त्यांच्यावर भिवंडी येथील न्यायालयात खटलाही चालू आहे. हिंदुत्वाविषयी स्वातंत्र्यापूर्वी भारतात वीर सावरकर यांनी भूमिका घेतली होती. सावरकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यासह हिंदुत्वाचा गौरव वाढवण्याचेही कार्य केले होते. सावरकर यांचा धाक ब्रिटिशांना ते अंदमान येथील कारागृहात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असतांनाही होता. त्यामुळे इंग्रजांकडून त्यांना अन्य बंदीवानांपेक्षा कठोर वागणूक दिली जायची. त्यांना स्वतंत्र बराकीत ठेवले होते. त्यांना लिखाणाचे साहित्य मिळू नये, यासाठी इंग्रजांनी प्रयत्न केले. तरी सावरकर यांनी घायपात्याच्या काट्याने भिंतीवर १० सहस्र ओळींचे ‘कमला’ हे महाकाव्य लिहिले. कोलू फिरवला, हाताने शहाळी सोलली, अंगात ताप असतांनाही पुष्कळ शारीरिक श्रमाची कामे केली. कोणत्या काँग्रेसींनी एवढी कठोर शिक्षा भोगली आहे का ? त्यांनी हिंदुत्वाविषयी घेतलेल्या चांगल्या भूमिकेमुळे कारागृहातील धर्मांध बंदीवानांवरही वचक बसवला आणि हिंदु बंदीवानांचा छळ रोखण्यात यश मिळवले. हिंदू आणि भारतीय यांच्यामध्ये स्वाभिमान जागृत केला.

असे असले, तरी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची महानता इंग्रजांसारख्या शत्रूनेही जाणली होती. लंडनच्या ‘इंडिया हाऊस’मध्ये सावरकरांचे वास्तव्य होते, याचा अभिमान इंग्रजांनी बाळगला. सावरकर यांच्या जन्मशताब्दीच्या दिवशी एक स्मृतीचिन्ह सन्मानपूर्वक विशेष समारंभ आयोजित करून ‘इंडिया हाऊस’ या वास्तूवर लावण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर हे तत्कालीन हिंदूंचे सर्वाेच्च नेते होते, हे कलिपुरुष बॅ. जिना यांनीही मान्य केले होते आणि ‘हिंदूंच्या बाजूने माझ्याशी बोलायचे असेल, तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना माझ्याशी बोलायला पाठवा’, असे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना सांगितले होते. नेताजींनी सावरकर यांच्याकडून मार्गदर्शन घेऊनच जपान येथे आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. ‘आझाद हिंद सेनेमुळेच आम्हाला भारत सोडावा लागला’, असे ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी लिखित कागदपत्रांमध्ये म्हटले होते. अशी ही साखळी असतांना काँग्रेसचे राहुल गांधी यांनी ‘सावरकर हे ब्रिटिशांकडून मानधन घ्यायचे’, हे विधान किती संतापजनक आणि त्यांना तात्काळ कठोर शिक्षा देण्यास पात्र आहे, हे लक्षात येते. रा.स्व. संघही हिंदुत्वाची भूमिका घेऊन कार्यरत आहे. याचाच अर्थ राहुल गांधी हे हिंदुत्वाचे जे पाईक आहेत, त्यांना संदर्भहीन विधाने करून भारतविरोधी ठरवतात.

काँग्रेसला सावरकरांचा धाक !

संघविरोधी पत्रकार बरखा दत्त वगैरेंना संघाचे व्यापक सामाजिक कार्य आता लक्षात येऊ लागल्यावर त्या संघाने केलेल्या सामाजिक कार्याच्या बातम्या देत आहेत; मात्र राष्ट्रीय नेते असलेल्या राहुल गांधींना संघाचे कार्य अजून कळलेले नाही, हे आश्चर्य ! संघाचे कार्य राहुल गांधींच्या हयातीत चालू असतांना ते त्यांना समजत नाही, तर मग त्यांना क्रांतीसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर आता हयात नसतांना त्यांचे कार्य कधीतरी समजेल का ? असा प्रश्न आहे. राहुल गांधीच काय, काँग्रेसलाच सावरकर अजून समजलेले नाहीत. काँग्रेसचे विसर्जन झाल्यावर तरी समजेल का ? हा प्रश्न आहे. स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा धाक होता, तर स्वातंत्र्यानंतर काँग्रेसला ! परिणामी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सावरकर यांच्यावर त्यांनी देहत्याग करेपर्यंत गुप्तहेरांच्या माध्यमातून पाळत ठेवली होती. अशा काँग्रेसच्या नेत्यांनी वैभवशाली, सुसंस्कृत आणि वेदांचा इतिहास असणार्‍या भारतावर ६ दशके राज्य केले, हेच हिंदू अन् भारतीय यांचे मोठे दुर्दैव आहे. हिंदुत्व आणि देशप्रेमी विरोधी मानसिकता बाळगणार्‍या काँग्रेसला लोकांनी देशावर राज्य करू दिले, ही भारतियांची ऐतिहासिक चूकच आहे.

राहुल यांचे घोर अज्ञान त्यांच्या काही विधानांवरून ठळकपणे निदर्शनास येते. ‘कोकाकोला’ आस्थापनाचा प्रारंभ एका सरबत विकणार्‍याने केला’, ‘मॅकडोनाल्ड’ आस्थापन एक ढाबा चालवणार्‍याने चालू केले’, ‘फोर्ड, मर्सिडिज ही आस्थापने एका मॅकेनिकने चालू केली होती’, अशी भयंकर विधाने करणार्‍या राहुल गांधी यांच्यावर त्या त्या वेळी लोकांनी खटले प्रविष्ट करण्याचे या आस्थापनांना आवाहन केले होते. राहुल गांधी यांच्या २ दिवसांपूर्वीच्या विधानाविषयी खरेतर लोक पुष्कळ संतप्त झाले असून असे अनेक खटले प्रविष्ट होण्याची शक्यता आहे. काँग्रेसची स्थापनाच मुळी इंग्रजांनी ‘भारत सोडल्यानंतरही त्याच्यावर त्यांचे नियंत्रण रहावे’, या विचाराने केली. अशा ‘काँग्रेसचे पूर्णत: विसर्जन करावे, ही म. गांधी यांची इच्छा होती’, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा भारतियांनी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि संघ यांच्यावर द्वेषमूलक टीका करणारे राहुल गांधी यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, ही जनतेची अपेक्षा !