उद्या आश्विन पौर्णिमा, म्हणजेच कोजागरी पौर्णिमा (९.१०.२०२२) या दिवशी श्री. बाळासाहेब विभूते यांचा ६८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
१. दैनिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार करतांना लक्षात आलेले प्रार्थनेचे महत्त्व !
१ अ. दैनिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार करण्याची सेवा करण्यापूर्वी सामूहिक प्रार्थना करणे : ‘वर्ष २०१० मध्ये मी रत्नागिरी जिल्ह्यातील अलोरे येथील शासकीय वसाहतीत रहात होतो. त्या वेळी मी दैनिक ‘सनातन प्रभात’ चे वर्गणीदार करणे, सनातननिर्मित सात्त्विक उत्पादनांचे वितरण करणे इत्यादी सेवा करत असे. ही सेवा मी प्रतिदिन कार्यालय सुटल्यावर २ घंटे, तसेच शनिवार आणि रविवार पूर्ण दिवस दुचाकी गाडी असलेल्या साधकाच्या साहाय्याने करत होतो. सेवा करण्यापूर्वी आम्ही अलोरे येथील श्री चिंतामणी मंदिरात एकत्र जमत होतो. ‘आज कोणत्या वर्गणीदारांना संपर्क करायचा ?’, याची सूची चिंतामणीसमोर ठेवून आम्ही सर्वजण सामूहिक प्रार्थना करायचो, ‘सर्व वर्गणीदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळू दे. आम्हा सर्व साधकांची आणि वर्गणीदारांची साधना प.पू. डॉक्टरांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) अपेक्षित अशी होऊ दे.’
१ आ. प्रार्थना करून सेवेला गेल्याने वर्गणीदार होण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळणे : प्रार्थना करून गेल्यावर एकही दिवस असे झाले नाही की, वर्गणीदार झाले नाहीत. सर्वच्या सर्व वर्गणीदार घरीच भेटायचे. कुठे बाहेर जाणार असतील, तरीही ते काही कारणास्तव घरीच थांबलेले असायचे आणि ठरवलेल्या सूचीप्रमाणे सर्वच्या सर्व जण वर्गणीदार व्हायचे. काही वेळा त्यापेक्षा अधिकचे नवीन वर्गणीदार व्हायचे आणि आमचा सेवेतील उत्साह वाढायचा. सेवा झाल्यावर आम्ही देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून पुढील वर्गणीदारांची सूची करायचो.
१ इ. प्रार्थना न करताच सेवेला गेल्याने प्रतिसाद न मिळणे आणि क्षमा मागून परत प्रार्थना करून सेवा केल्यावर संपूर्ण सकारात्मक प्रतिसाद मिळणे : एक दिवस आम्हाला सेवेला जाण्यास उशीर झाला. त्या वेळी एक साधक ‘आता प्रार्थना नको. लवकर चला’, असे म्हणाल्याने आम्हीही तसेच सेवेला निघालो. तेव्हा दुपारपर्यंत एकही वर्गणीदार झाला नाही; म्हणून आम्ही देवाची क्षमा मागून पुन्हा देवळात येऊन प्रार्थना केली. त्यानंतर जी वर्गणीदारांची सूची आम्ही काढली होती, ते सर्व जण वर्गणीदार झाले. यावरून माझ्या लक्षात आले, ‘देवच सर्वकाही करून घेत असतो.’ प्रार्थना, क्षमायाचना आणि कृतज्ञतापूर्वक सेवा करण्याचे महत्त्व याद्वारे देवाने लक्षात आणून दिले.
२. मंदिरात धर्मशिक्षण फलक लावण्याविषयी आलेली अनुभूती
२ अ. पहाटे जाग येऊन मनात धर्मशिक्षण देणारे फलक मंदिरांत लावण्याचे विचार तीव्रतेने येणे आणि तशीच प्रार्थना मारुति मंदिरात गेल्यावर होणे : वर्ष २०१० मध्ये एक दिवस पहाटे सकाळी ४ वाजता मला जाग आली. त्या वेळी माझ्या मनात तीव्रतेने विचार आला, ‘प.पू. डॉक्टर नेहमी म्हणतात, ‘समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे.’ त्यानुसार ‘देवळात दर्शन कसे घ्यायचे ?’, ‘नामजप करण्याचे महत्त्व !’, अशा प्रकारचे फलक (बोर्ड) करून प्रत्येक मंदिरात लावायला हवेत.’ त्या दिवशी शनिवारी मी गावातल्या मारुति मंदिरात दैनिक ‘सनातन प्रभात’ घेऊन गेलो होतो. मारुतिरायालाही उत्कटतेने प्रार्थना झाली, ‘हे देवा, माझ्या गुरूंनी हे शिवधनुष्य उचलले आहे. त्यांच्या या धर्मप्रसाराच्या कार्यात मला खारीचा वाटा उचलता येऊ दे. हे धर्मशिक्षणाचे फलक सर्व मंदिरात लावले जाऊ देत.’
२ आ. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये धर्मशिक्षण फलक लावण्याविषयीची चौकट वाचून ‘गुरुच मनात विचार देऊन पूर्ण करून घेतात’, याची प्रचीती येणे : प्रार्थना करून मी त्या दिवशीचा दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचायला उघडला, तर त्यामध्ये ‘धर्मशिक्षणाचे महत्त्व असणारे फलक (फ्लेक्स) मंदिरात लावून अध्यात्मप्रसार करू शकतो’, अशी चौकट आली होती. ती वाचून माझ्या दोन्ही डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागले. पहाटे ४ वाजता माझ्या मनात तेच विचार गुरूंनी घातले अन् मला अनुभूती आली. त्यानुसार लगेच कृती केल्यावर अलोरे गावात अन् आजूबाजूच्या सर्व गावांतील मंदिरांत धर्मशिक्षणाचे फलक लावण्यासाठी पुष्कळ चांगला प्रतिसाद मिळून सर्व मंदिरांत फलक लावले गेले. ‘गुरुच मनात विचार देतात आणि तो पूर्णही करून घेतात’, याची मला प्रचीती आली.’