देहलीतील आपचे मंत्री राजेंद्र पाल गौतम यांच्या उपस्थितीत हिंदु देवतांची पूजा न करण्याची शपथ

आम आदमी पक्षाच्या मंत्र्यांचे हिंदुद्वेषी कृत्य !

आपचे मंत्री राजेंद्र पाल गौतम

नवी देहली – येथील करोलबाग परिसरातील राणी झांशी मार्गावर असलेल्या आंबेडकर भवनात समाजकल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम पार पडला. यामध्ये लोकांनी केवळ बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. या वेळी ‘हिंदु देवतांची पूजा करणार नाही आणि त्यांना देव मानणार नाही’, अशी शपथ देण्यात आली. देहलीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाचे समाजकल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. मंत्र्यांच्या उपस्थितीत विजयदशमीच्या दिवशीच हिंदु धर्माविषयी अशी द्वेषमूलक शपथ देण्यात आल्याने याचा विरोध होत आहे. मंत्री राजेंद्र गौतम यांनी हिंदु देवतांचा अवमान केल्याचीही टीका होत आहे. ‘राजेंद्र गौतम यांनी हिंदु समाजाची क्षमा मागावी’, अशी मागणी केली जात आहे.

या कार्यक्रमाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. याविषयी करोलबागचे भाजपचे नगरसेवक आणि माजी महापौर योगेंद्र चंदोलिया म्हणाले की, नागरिक स्वेच्छेने कोणताही धर्म स्वीकारू शकतात; परंतु हिंदु समाजातील देवतांचा अवमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही. अरविंद केजरीवाल यांनी अशा हिंदुद्वेषी मंत्र्याला मंत्रीमंडळातून काढून टाकावे.

याविषयी मेजर सुरेंद्र पुनिया यांनी ट्वीट करून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी सनातन धर्म, भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्रीराम यांची खुल्या व्यासपिठावरून निंदा केली आहे. ते देहलीत मोठ्या प्रमाणात धर्मांतर करत आहेत.

संपादकीय भूमिका

हिंदु धर्मात प्रत्येकाला स्वतःच्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य असतांना सार्वजनिक कार्यक्रमात अशा प्रकारची शपथ देणे, हे राज्यघटनाविरोधी कृत्य आहे. अशा प्रकारे हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद होणे आवश्यक !