नागपूर येथील रा.स्व. संघाच्या मुख्यालयाला भारत मुक्ती मोर्चाकडून घेराव घालण्याचा प्रयत्न !  

(म्हणे) ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी राज्यघटनेच्या विरोधात आहे !’  – वामन मेश्राम, बामसेफ

नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी ही भारतीय राज्यघटनेला धरून नाही, असे म्हणत बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत मुक्ती मोर्चा’च्या वतीने ६ ऑक्टोबर या दिवशी येथील संघाच्या मुख्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी मुख्यालयाबाहेर बंदोबस्त वाढवला असून मेश्राम यांसह आंदोलकांना कह्यात घेतले.

या मोर्च्यासाठी शेकडो कार्यकर्ते शहरात आले होते; मात्र शहरात धम्मचक्र प्रवर्तन दिनासह इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन चालू असल्याने, तसेच घेराव मोर्चा आणि बेझनबाग येथील सभा यांना न्यायालयाने अनुमती नाकारल्याने पोलिसांनी या मोर्च्याला पुढे जाऊ दिले नाही. याआधी उच्च न्यायालयानेही मेश्राम यांची याचिका फेटाळून लावत ‘६ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत पोलिसांकडे अर्ज करून कार्यक्रम आयोजित करावा’, असे निर्देश दिले होते.

संपादकीय भूमिका

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आतापर्यंत राज्यघटनेच्या विरोधात कधीही कृती केली नाही; मात्र केवळ हिंदुद्वेषापोटी जन्म घेतलेल्या ‘बामसेफ’ आणि भारत मुक्ती मोर्चा यांच्या वतीने काढण्यात आलेले मोर्चे समाजात द्वेष पसरवण्याविना काही करत नाहीत !