पारपत्र आणि व्हिसा सादर करण्याच्या न्यायालयाच्या आदेशामुळे वारंवार गुन्हा करणार्‍या नायजेरियाच्या नागरिकांना बसली चपराक !

पणजी, ३ ऑक्टोबर (वार्ता.) – राज्यात नायजेरियाचे नागरिक आणि अमली पदार्थ व्यवसाय यांच्यामधील संबंध अनेक वर्षांपासूनचा आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने नोव्हेंबर २०२१ मध्ये एखाद्या गुन्ह्यात गजाआड असलेल्या विदेशी नागरिकाला ‘त्याला जामीन मिळवायचा असल्यास त्याने त्याचे पारपत्र (‘पासपोर्ट’) आणि ‘व्हिसा’ न्यायालयात सादर करावा लागेल’, असा आदेश दिला. या आदेशामुळे गोव्यात अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या आणि वारंवार गुन्हे करून जामिनावर मोकाट सुटणार्‍या नायजेरियाच्या नागरिकांना चपराक बसली आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतर १० मासांनी एखाद्या गुन्ह्यात गजाआड झालेले नायजेरियाचे ५४ नागरिक त्यांना जामीन मिळूनही अधिकृत कागदपत्रे नसल्याने अजूनही न्यायालयीन कोठडीची शिक्षा भोगत आहेत. यापूर्वी नायजेरियाचे नागरिक एखादा गुन्हा करून कारागृहात जात. संबंधितांवर प्रथमदर्शनी अहवाल नोंदवला जात असे. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका होत असे. यानंतर या प्रथमदर्शनी अहवालाची प्रत घेऊन  ‘स्वत:च्या विरोधात न्यायालयीन दावा चालू आहे’, असे सांगून नायजेरियाचे नागरिक गोव्यातच नव्हे, तर भारतात कुठेही पारपत्र आणि ‘व्हिसा’ यांविना फिरून अमली पदार्थ किंवा अन्य गुन्हे यांमध्ये सहभागी होत असत. त्यामुळे प्रथमदर्शनी अहवालाची प्रत म्हणजे अधिकृत वास्तव्य करण्यासाठीची एक प्रत’, असेच समीकरण बनलेले होते. त्याचप्रमाणे जामिनावर असतांना पुन्हा गुन्हा करून कारागृहात जाणे आणि पुन्हा जामीन घेणे, असा प्रकार चालू होता; मात्र न्यायालयाने ‘जामीन हवा असल्यास पारपत्र आणि व्हिसा न्यायालयात सादर करा’, असा आदेश दिल्यापासून अवैध वास्तव्य करणारे नायजेरियाचे नागरिक जामीन मिळण्यास पात्र असूनही पारपत्र आणि व्हिसा नसल्याने दीर्घकाल न्यायालयीन कोठडीत अडकून पडले आहेत.

वर्ष २०१० ते २०१४ या काळात अवैधरित्या वास्तव्य करणे आणि अमली पदार्थ व्यवसायातील सहभाग या आरोपांखाली नायजेरियाच्या १८९ नागरिकांना कह्यात घेण्यात आले होते. वर्ष २००९ नंतर अमली पदार्थ व्यवहाराच्या खाली कह्यात घेतलेल्या विदेशी नागरिकांमध्ये ४० टक्के नागरिक हे नायजेरियाचे आहेत. ३१ ऑक्टोबर २०१३ मध्ये अमली पदार्थ व्यवसायावरून एका नायजेरियाच्या नागरिकाची झालेली हत्या आणि यानंतर नायजेरियाच्या नागरिकांच्या २ गटांमध्ये झालेल्या भांडणामुळे त्यांनी पर्वरी येथे अडवलेला हमरस्ता आणि पोलिसांवर केलेले आक्रमण हा प्रकारही गोमंतकीय नागरिक अजून विसरलेले नाहीत.