‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या प्रकल्पाअंतर्गत राज्यात शालेय विद्यार्थ्यांसाठी होणार्‍या स्पर्धेत मराठी भाषेचा पर्यायच नाही !

‘एन्.सी.ई.आर्.टी.’चा मराठीद्वेष जाणा !

पुणे – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एन्.सी.ई.आर्.टी.) लोकसंख्या शिक्षण प्रकल्पाअंतर्गत राज्यात शालेय विद्यार्थ्यांसाठी होणार्‍या भूमिका अभिनय स्पर्धेत मराठी भाषेचा पर्यायच देण्यात आला नाही. ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ मध्ये मातृभाषेतून शिक्षणावर भर दिला जात आहे; मात्र या स्पर्धेसाठी केवळ इंग्रजी आणि हिंदी माध्यमांचाच पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका आदीं शाळांतील विद्यार्थ्यांना योग्य संधी कशी मिळणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य प्रवक्ते महेंद्र गणपुले यांनी सांगितले की, या स्पर्धेसाठी केवळ इंग्रजी आणि हिंदी माध्यमांचाच पर्याय देण्यात आल्याने जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका शाळांतील सर्वसामान्य विद्यार्थी स्पर्धेपासून दूर राहू शकतात. यातून चुकीचा संदेश जातो. त्यामुळे या संदर्भात गांभीर्याने विचार करून पालट केला पाहिजे.

यावर ‘एन्.सी.ई.आर्.टी.’चे उपसंचालक डॉ. नेहा बेलसरे यांनी सांगितले की, ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या वतीने होणारी स्पर्धा देश पातळीवरील आहे. त्यात राज्य पातळीवरील विजेत्यांची राष्ट्रीय पातळीवर निवड होते. एन्.सी.ई.आर्.टी.च्या मार्गदर्शक सूचनांमध्ये मराठी भाषेचाही समावेश करण्याची विनंती ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ला करण्यात येईल. लोकनृत्य स्पर्धेला भाषेचा अडसर नाही.