अमरावती येथे पी.एफ्.आय. संघटनेच्या जिल्हा संयोजकाच्या दुकानावर पोलिसांची धाड !

साहित्य जप्त !

अमरावती – केंद्रशासनाने ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर पी.एफ्.आय. संघटनेचा अमरावती जिल्हा संयोजक सोहेल अन्वर नदवी अब्दुल कदीर (वय ३८ वर्षे) याच्या छायानगरातील दुकानावर रात्री धाड टाकली. या वेळी पोलिसांनी काही साहित्य या ठिकाणाहून जप्त केले आहे. या दुकानाचा वापर तो ‘पी.एफ्.आय.’च्या कामकाजासाठी करत असल्यामुळे ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.

सोहेल अन्वर नदवी याचे छायानगर भागात ‘ब्युटी कलेक्शन इमिटेशन ज्वेलरी’चे दुकान आहे. ‘यापुढे संबंधित दुकानात पोलीस आयुक्तांच्या अनुमतीविना कुणीही प्रवेश करू नये किंवा वास्तव्य करू नये’, असा आदेश अमरावती पोलिसांकडून काढण्यात आला आहे. गृह विभागाच्या आदेशानुसार केंद्रशासनाने अनधिकृत कृत्ये (प्रतिबंधक) कायदा अन्वये प्रदान करण्यात आलेले सर्व अधिकार हे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात पोलीस आयुक्त यांना दिले आहेत.