देशात ‘५जी’ भ्रमणभाष सेवेचे उद्घाटन !

मुंबईसह ८ शहरांमध्ये सेवा !

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑक्टोबर या दिवशी भारतातील ‘५जी’ भ्रमणभाष सेवेचे उद्घाटन केले. देशातील ‘जीओ’ आणि ‘एअरटेल’ या आस्थापनांनी देशात या सेवेचा प्रारंभ केला आहे. मुंबईसह देशातील ८ शहरांत सर्वप्रथम ही सेवा मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित असणारे ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सांगितले की, ‘५जी’ ही ‘डिजिटल कामधेनू’ आहे. हे तंत्रज्ञान भारतियांच्या जीवनात आरोग्य, संपत्ती आणि आनंद आणेल. त्यामुळे स्वस्त दरात योग्य सेवा देणे शक्य होणार आहे. ‘जिओ’च्या माध्यमातून डिसेंबरपर्यंत देशाच्या कानाकोपर्‍यांत ‘५जी’ सेवा पोचवली जाईल.

‘५ जी’मुळे होणारे लाभ !

वापरकर्ते जलद गतीचे इंटरनेट वापरू शकणार आहेत. २ जीबी क्षमतेच्या धारिका (फाइल्स) १० ते २० सेकंदात डाऊनलोड होतील. कृषी क्षेत्रातील शेतांच्या देखरेखीखाली ड्रोनचा वापर शक्य होणार आहे. मेट्रो आणि चालकविरहित वाहने चालवणे सोपे होणार आहे. यासंह कारखान्यांमध्ये ‘रोबोट्स’ वापरणे सोपे होणार आहे.