१. दिनांक ७.१०.२०२१
१ अ. पैंजणांचा आवाज येणे : ‘या दिवशी भक्तीसत्संग ऐकतांना पैंजणांचा ‘छूम छूम’ असा आवाज येत होता आणि तो मनाला आनंद देत होता. त्या वेळी ‘हृदयाला जणू देवीच्या चरणांचा स्पर्श होत आहे’, असे मला जाणवले.
१ आ. बांगड्यांचा नाद ऐकू येणे : ‘देवी आशीर्वाद देत असून देवीने आशीर्वादासाठी हात वर करतांना तिच्या हातातील बांगड्यांचा आवाज ऐकू येत आहे आणि आई भक्तांच्या डोक्यावरून जणू हात फिरवत आहे’, असे मला जाणवले.
१ इ. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यातील देवीतत्त्व अधिक वाढले आहे’, असे जाणवून आज्ञाचक्रावर थंडावा जाणवणे : मी जेव्हा मानस रूपाने श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणांवर डोके टेकले, त्या वेळी ‘त्यांच्यातील देवीतत्त्व अधिकच वाढले आहे’, असे मला जाणवले. मी त्यांच्या चरणांवर डोके टेकून नमस्कार केला. तेव्हापासून सत्संग संपेपर्यंत मला माझ्या आज्ञाचक्रावर थंडावा जाणवत होता. नंतर दोन्ही डोळ्यांच्या पापण्यांना थंडावा जाणवला.
१ ई. देवी युद्धाला गेल्यावर अंगावर शहारे येऊन डोळे अन् हात गरम होणे : ज्या वेळी भगवती कालिकादेवी आणि तिचे रूप कौशिकीदेवी धूम्रलोचन या असुराला मारायला युद्ध करायला गेली, त्या वेळी ‘अंगावर शहारे येणे, डोळे आणि हात गरम होणे’, असे मला अनुभवास येत होते.
१ उ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई सत्संग घेत असतांना ‘देवीच भक्तांचा सत्संग घेत आहे’, असे जाणवणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई सत्संग घेत असतांना ‘देवीच भक्तांचा सत्संग घेत आहे. भक्तांच्या भक्तीसाठी देवीला या भूमीवर यावे लागले असून भक्तांना लागलेली भूक आईच शमवू शकते’, असे मला जाणवले.
२. दिनांक ८.१०.२०२१
२ अ. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा आवाज हृदयात जात आहे’, असे जाणवणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई सत्संगात बोलत असतांना ‘त्यांचा आवाज थेट हृदयात जात आहे. हृदयात तो आवाज घुमत आहे आणि त्या आवाजाचा हृदयाला जणू स्पर्श होत आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी ‘देवी तिच्या बाळांना भेटायला आली आहे’, असे मला जाणवले.
३. दिनांक ११.१०.२०२१
३ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ बोलत असतांना आज्ञा आणि अनाहत या चक्रांवर संवेदना जाणवून ‘त्या सत्संगातील सर्वांना एकेका लोकात घेऊन जात आहेत’, असे जाणवणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई ‘आदिशक्तीने त्रिदेवांना विमानातून नेणे’ या संदर्भातील कथा सांगत होत्या. त्या वेळी ‘त्यांचा सत्संग पुष्कळ उच्च स्तरावर चालू आहे’, असे मला जाणवले. सत्संगात पुष्कळ चैतन्य जाणवत होते. त्या बोलत असतांना आज्ञा आणि अनाहत या चक्रांवर संवेदना जाणवत होत्या. ‘श्रीसत्शक्ति बिंदाताई सत्संगातील सर्वांना ब्रह्मलोक, विष्णुलोक, शिवलोक आणि देवीचा लोक या लोकांत घेऊन जात आहेत’, असे मला जाणवले. त्या वेळी मला हलकेपणा जाणवत होता आणि ‘मी कुठे आहे ?’, हेच मला कळत नव्हते. एका लोकातून जातांना पुष्कळ आनंद होत होता. ‘त्या लोकांतून पुन्हा पृथ्वीवर येऊच नये’, असे मला वाटत होते.
३ आ. ‘गोंधळाचे गीत’ लावल्यावर देवीला मनापासून हाक मारून प्रार्थना करणे आणि ‘देवीकडून ज्योतीच्या रूपात शक्ती येत आहे’, असे जाणवून साधिकेला आनंद होणे : ‘गोंधळाचे गीत’ लावल्यावर मला कुलदेवी, कालिकामाता, भवानीमाता, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे स्मरण झाले. ‘गोंधळ घालतो, आई गोंधळ घालतो’, हे ऐकतांना मी आईला मनातून हाक मारत होते. ‘आई, हिंदु राष्ट्र शीघ्रातीशीघ्र येऊ दे. हिंदु राष्ट्राची पहाट उजाडू दे. आई, धर्मासाठी लढण्याची आम्हाला शक्ती दे’, असे मी मनातून आदिशक्ती भगवतीमातेला सांगत होते. त्या वेळी ‘आई लेकरांना शक्ती देत आहे’, असे मला जाणवले. त्यानंतर माझ्या अंगावर रोमांच आले. ‘मला देवीकडून ज्योतीच्या रूपात शक्ती मिळत आहे’, असे जाणवले. मला आल्हाददायक वाटून आनंद होत होता.
४. दिनांक १२.१०.२०२१
४ अ. भजन ऐकतांना ‘हृदयातून एक ज्योत निघून मातांची आरती करत आहे’, असे जाणवणे : नंतर ‘जगत्जननी, जगत्कल्याणी’ हे भजन लागले. त्या वेळी मला कुलदेवता, कालिकामाता, श्री विद्याचौडेश्वरीदेवी, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या दिसल्या. त्या वेळी ‘माझ्या हृदयातून एक ज्योत निघून या मातांची आरती करत आहे आणि ती ज्योत आपोआप गोलाकार फिरत आहे’, असे मला जाणवले.
५. दिनांक १४.१०.२०२१
५ अ. श्री शारदादेवीचे वीणावादन ऐकतांना ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ कमळावर बसल्या आहेत’, असे दिसून श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ वीणावादन करतांना दिसणे : सत्संग ऐकतांना मी खोलीत होते. तेव्हा मला सुगंध येत होता. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांचे बोल माझ्या मनाला स्पर्श करत होते. श्री शारदादेवीचे वीणावादन ऐकतांना मला ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई पांढर्या रंगाची साडी नेसल्या असून ध्यानस्थ स्थितीत कमळावर बसल्या आहेत’, असे दिसले. त्यांच्या हाताच्या बोटांची मुद्रा कमळाप्रमाणे होती. तिथे मला साक्षात् ब्रह्मदेवाचे दर्शन झाले.
श्रीसत्शक्ति बिंदाताईंच्या शेजारी दुसर्या कमळात श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ वीणावादन करत होत्या. एक बाळ आईसमोर गाणे गात होते, तर बाकी बाळे आईसमोर नाचत होती. आकाशात पशू-पक्षी आनंदाने भरारी घेत होते. ‘आई सर्वांना आनंदाने न्हाऊ घालत आहे’, असे मला जाणवले. दोन्ही माता आपल्या सर्व बाळांकडे वात्सल्यभावाने पहात होत्या, जणू सर्वांवर भक्तीचा वर्षावच करत होत्या.
५ आ. वीणानाद ऐकतांना मनाला उत्साह जाणवून शांत आणि आल्हाददायक वाटत होते.
५ इ. सत्संगात झालेला त्रास : आरंभापासून शेवटपर्यंत माझ्या सहस्राराच्या ठिकाणी भेग पडावी, असे दुखत होते. वेदना न्यून व्हाव्यात; म्हणून मी डोक्याला तेल लावले, तरी वेदना उणावल्या नाहीत.’
– कु. प्रतीक्षा हडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.१०.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |