पी.एफ्.आय.वरील बंदीचे समर्थन करणार्‍या मौलानांना जीभ कापण्याची धमकी

अशा धमक्यांनी मी घाबरणार नाही ! – मौलानांची स्पष्टोक्ती

(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक)

मौलाना शहाबुद्दीन रिझवी

बरेली (उत्तरप्रदेश) – ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) या संघटनेवरील बंदीचे समर्थन करणारे येथील मौलाना शहाबुद्दीन रिझवी यांना त्यांची जीभ कापण्याची धमकी दूरभाषवरून देण्यात आली. धमकी देणार्‍याने स्वतःचे नाव अब्दुल समद असे सांगितले. तो देहलीतील शाहीन बागमध्ये रहाणारा आहेे. मौलाना रिझवी यांनी ट्वीट करून याची माहिती दिल्यावर पोलिसांनी चौकशी चालू केली आहे. मौलाना रिझवी ‘ऑल इंडिया मुस्लिम जमात’चे अध्यक्ष आहेत. या धमकीनंतर त्यांनी एक व्हिडिओही प्रसारित केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, ‘‘मी शांत बसणार्‍यांपैकी नाही. अशा धमक्यांनी मी घाबरणार नाही.’’

मौलाना शहाबुद्दीन म्हणाले की, कन्हैयालाल यांच्या हत्येचा निषेध केल्यानंतरसुद्धा माझ्या विरोधात फतवा काढण्यात आला होता. तेव्हाही मला धमक्या मिळाल्या होत्या. त्या वेळी मी याची माहिती पोलिसांना दिली होती; मात्र पोलिसांनी मला संरक्षण पुरवले नाही.