(म्हणे) ‘मी देवीचा अपमान केला नाही, आमच्या घरातही देवीची पूजा होते !’ –  छगन भुजबळ, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई – आम्ही हिंदू आहोत. आमच्या घरातही घटस्थापना होते. मीही कुलदेवीच्या दर्शनाला जातो. मी देवीचा अपमान केलेला नाही. मी केवळ इतिहास सांगितला, अशी सारवासारव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली. ‘जिला आपण पाहिले नाही, त्या सरस्वतीदेवीची पूजा कशाला करायची ?’, या भुजबळ यांच्या वक्तव्यावर हिंदूंनी तीव्र संताप व्यक्त केल्यानंतर २९ सप्टेंबर या दिवशी पत्रकार परिषद घेऊन भुजबळ यांनी अशा प्रकारे सारवासारव केली.

भुजबळ पुढे म्हणाले, ‘‘मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. मी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांपुढे हे बोललो. सत्यशोधक समाजाचे वाङ्मय वाचाल, तर ते याच्याही पुढे आहे. मी आधी शिवसेनेत होते; मात्र समता परिषदेत आल्यावर माझे विचार पालटले. अंधश्रद्धेला आमचा विरोध आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कोणती पूजा करा; मात्र शाळेच्या पहिल्या दिवसापासून फुले आणि शाहू यांना बाजूला ठेवून केले जाते, ते योग्य नाही. आपण आई-वडील, तसेच गुरुजी यांच्या पाया पडतो, मग ज्या महापुरुषांनी या शिक्षणाची कवाडे उघडली, त्यांची पूजा करण्यास तुमचा विरोध आहे का ? कुणी कुणाची पूजा करावी, याचे हिंदु धर्मात प्रत्येकाचे मत आहे. तुम्ही तुमची दैवतांची पूजा करा, आम्ही आमच्या दैवतांची पूजा करू. हा समता परिषदेचा कार्यक्रम होता. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा संबंध नाही.’’

(कुणी देवीची पूजा करावी किंवा न करावी, हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे; परंतु सार्वजनिकरित्या श्री सरस्वतीदेवीला काल्पनिक ठरवून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवण्याचा अधिकार भुजबळ यांना कुणी दिला ? एकीकडे ‘घरात देवीची पूजा होते’, असे सांगायचे आणि बाहेर मतांसाठी हिंदूंच्या देवतांवर टीका करणार्‍या अशा दुतोंडी नेत्यांचा दांभिकपणा जनतेने ओळखावा ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • ‘घरात देवीची पूजा करायची आणि बाहेर मात्र देवीची पूजा करू नका सांगायचे’, असे करणार्‍या दांभिक नेत्यांना ओळखा !
  • राजकीय स्वार्थासाठी हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍या अशा राजकारण्यांना हिंदूंनी का निवडून द्यावे ?