चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना पदच्युत केल्याच्या वृत्तावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे मौन

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग

बीजिंग (चीन) – चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना पदच्युत करून स्थानबद्ध करण्यात आल्याचे वृत्त २४ सप्टेंबरच्या सायंकाळपासून जगभरात सामाजिक माध्यमांद्वारे पसरले आहे. या घटनेची पुष्टी आंतरराष्ट्रीय माध्यमांनी अद्याप केलेली नाही. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या वृत्ताविषयी मौन बाळगले आहे. याविषयी चीनमधील माध्यमांनीही कुठलेही वृत्त प्रसारित केलेले नाही. अशा प्रकारचे वृत्त शी जिनपिंग यांच्याविरोधात कट असल्याचा दावा काही वृत्तसंकेतस्थळांनी केला आहे. शी जिनपिंग अझरबैजान येथील समरकंदमध्ये शांघाय सहकार्य परिषदेतून जाऊन आल्यावर त्यांना कह्यात घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

१. समरकंदमधील कार्यक्रमाची औपचारिक सांगता न करताच निघालेल्या जिनपिंग यांना बीजिंगमध्ये पोचताच अटक करण्यात करून घरात स्थानबद्ध करण्यात आल्याचा दावा ट्विटरवर करण्यात आला आहे. बीजिंग विमानतळावरून आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत ६ सहस्र विमानांची उड्डाणे रहित झाल्याचीही माहिती प्रसारित झाली आहे.

२. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या १६ ऑक्टोबरला नियोजित बैठकीत जिनपिंग तिसर्‍यांदा चीनच्या अध्यक्षपदासाठी दावा करण्याच्या सिद्धतेत असतांनाच त्यांच्याविरोधात या अफवा पसरल्या आहेत, असेही सांगण्यात येत आहे.