तालिबान्यांकडे असलेल्या अमेरिकेच्या शस्त्रास्त्रांचा परिणाम !

‘अमेरिकेने अफगाणिस्तान येथून परततांना हेलिकॉप्टरसह अनेक आधुनिक शस्त्रे आणि वाहने तेथेच सोडून दिली होती. यातील एक हेलिकॉप्टर तालिबानी उडवण्याचा प्रयत्न करत होते; पण तेव्हा त्याचा अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये अपघात झाला. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर तालिबान्यांकडे असलेल्या अमेरिकेच्या शस्त्रास्त्रांच्या परिणामांचे विश्लेषण या लेखात पाहूया.

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

१. अमेरिकेच्या सैन्याने मोठ्या प्रमाणात आधुनिक शस्त्रे सोडून पळ काढणे आणि त्यांना ती शस्त्रे वापरता येऊ नयेत, यासाठी अमेरिकेने त्यातील महत्त्वाचे सुटे भाग काढून नेणे

‘अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानमधून पळून गेले. तेव्हा त्यांनी अनुमाने साडेतीन अब्ज डॉलर्सची (२८ सहस्र कोटी रुपये) शस्त्रे तेथेच सोडून दिली. यात विमाने, हेलिकॉप्टर्स, रणगाडे, चिलखती वाहने, विविध अत्याधुनिक शस्त्रे, बंदुका इत्यादींचा समावेश होता. ही शस्त्रे परत घेऊन जाण्यासाठी लागणारी विमाने अमेरिकेकडे नव्हती. त्यामुळे त्यांनी ती तेथेच टाकून दिली. ही शस्त्रे तालिबान्यांना वापरता येऊ नयेत; म्हणून त्यांनी या शस्त्रांमधील ‘सेमीकंडक्टर चिप्स’, ‘फिगर मेकॅनिझम्’ अशा प्रकारचे सुटे भाग काढून नेले. सध्या त्यांच्याकडे पारंपरिक युद्धात वापरले जाणारे रणगाडे, हेलिकॉप्टर, लढाऊ विमाने यांसारखी मोठी शस्त्रे, तसेच आतंकवादी कारवायांसाठी वापरण्यात येणार्‍या बंदुका, हँडग्रेनेड, लाईट मशीनगन अशी शस्त्रे मोठ्या प्रमाणावर आहेत.

२. तालिबान्यांनी अमेरिकेच्या शस्त्रास्त्रांची चीन आणि पाकिस्तान यांना विक्री करणे 

तालिबान्यांनी आतापर्यंत केवळ बंदुका आणि स्फोटक पदार्थ यांचाच वापर केला. त्यामुळे त्यांच्याकडे विमाने, हेलिकॉप्टर्स चालवायला प्रशिक्षित वैमानिकच नाहीत. तोफा, रणगाडे चालवायला प्रशिक्षित चालकच नाहीत, तसेच अमेरिका अफगाणिस्तानमध्ये जी शस्त्रे सोडून गेली होती, त्यांना दुरुस्त करून वापरण्यासाठी चीन आणि पाकिस्तान हे तालिबानला साहाय्य करत आहेत. त्यातील काही शस्त्रे तालिबानी चीन आणि पाकिस्तान यांना विकत आहे. चीनला अमेरिकेच्या शस्त्रांचा अभ्यास करण्यासाठी, तर पाकिस्तानला त्यांच्याकडे असलेल्या अमेरिकी बनावटीच्या शस्त्रांमध्ये वापरण्यासाठी ही शस्त्रे हवी आहेत. ज्याप्रमाणे भंगारातून वस्तू विकल्या जातात, त्याप्रमाणे ही शस्त्रे चीन आणि पाकिस्तान यांना दिली जात आहेत. अशा प्रकारे ही शस्त्रे मोठ्या प्रमाणात तालिबान्यांच्या हातातून पाकिस्तानातील अन्य आतंकवाद्यांकडे जात आहेत.

३. अमेरिकेची आधुनिक शस्त्रास्त्रे आतंकवाद्यांच्या हाती लागणे

काही दिवसांपूर्वी भारताच्या श्रीनगरमध्ये एक आतंकवादी मारला गेला. तेव्हा त्याच्याकडे अमेरिकी बनावटीच्या ‘एम्-१६’ या बंदुका मिळाल्या होत्या. त्यामुळे ही शस्त्रे काश्मीरमधील आतंकवाद्यांपर्यंत पोचली. असे असले, तरी या आतंकवाद्यांना मारण्यासाठी भारतीय सैन्य सक्षम आहे. अफगाणिस्तानकडे मोठी शस्त्रे असली, तरी तालिबानी कुणाशीही लढाई करू शकत नाहीत. अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रांचा बाजार भरवला जात आहे. जे आतंकवादी गट किंवा देश काही प्रमाणात अमेरिका बनावटीची शस्त्रे वापरतात, त्यांना ही शस्त्रे पाठवली जाऊ शकतात. या शस्त्रांचा पारंपरिक युद्धात वापर होण्याची शक्यता पुष्कळ अल्प आहे; कारण त्यासाठी त्यांना मोठा व्यय करावा लागेल, तसेच ही शस्त्रे चालवण्यासाठी त्यांच्याकडे प्रशिक्षित सैनिकांचा अभाव आहे. सध्या तालिबानी किंवा अफगाणिस्तानी युवकांनी अमेरिका, युरोप आणि भारत येथील सैनिकी प्रशिक्षण संस्थांमध्ये थोडे प्रशिक्षण घेतलेले आहे. त्यामुळे पुढील काळात ते या शस्त्रांचा वापर करण्याची शक्यता आहे; परंतु ते हा वापर कुणाच्या विरोधात करणार आहेत, हे स्पष्ट नाही.

४. अमेरिकेची आधुनिक शस्त्रे जगासाठी धोकादायक ठरणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक !

या शस्त्रांचा पारंपरिक युद्धात वापर होण्याची शक्यता अल्प आहे; परंतु तालिबान, इसिस, बलुचिस्तान लिबरेशन आर्मी, बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट अशा आतंकवादी गटांना ही शस्त्रे मिळत आहेत. त्यामुळे येत्या काळात पाकिस्तानमध्ये हिंसाचार वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काही शस्त्रे भारतातील आतंकवादी गट, उदा. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद, हिजबूल मुजाहिदिन यांच्याकडेही पोचायला प्रारंभ झाला आहे. असे असले, तरी तालिबानी किंवा विदेशी आतंकवादी यांचा प्रतिकार करण्यासाठी भारतीय सैन्य समर्थ आहे. अमेरिकेची ही शस्त्रे जगाला धोकादायक ठरू शकतात, याविषयी शंका नाही.

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे