पर्यावरणपूरक जीवनशैली न अंगीकारल्यास हवामानातील पालट अपरिवर्तनीय होईल ! – डॉ. गिरीश जठार, मुंबई

सृष्टी कन्झर्वेशन फाऊंडेशनचे साहाय्यक संचालक डॉ. गिरीश जठार

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) – औद्योगीकरणानंतर पृथ्वीच्या तापमानात वाढ व्हायला प्रारंभ झाला. वाढलेले प्रदूषण, हवामानातील पालट यांचा परिणाम शेती, मासेमारी, आरोग्य यांसह संपूर्ण जीवसृष्टीवर झालेला आहे. त्यामुळे येणार्‍या नैसर्गिक आपत्तींमुळे माणसाचे जीवन असह्य झाले आहे. यावर उपाय म्हणजे जंगलांचे संवर्धन करणे, झाडे लावणे, नैसर्गिक संसाधनांचा वापर अल्प करणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारणे हा आहे. आवश्यक ती  काळजी आणि उपाययोजना न केल्यास हवामानातील पालट अपरिवर्तनीय होईल, अशी चेतावणी मुंबई येथील सृष्टी कन्झर्वेशन फाऊंडेशनच्या (सृष्टी रक्षण संस्थेच्या)संशोधन विभागाचे साहाय्यक संचालक डॉ. गिरीश जठार यांनी दिली.

येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालय आणि सृष्टी कन्झर्वेशन फाऊंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हवामानातील पालट’ या विषयावर ‘ऑनलाईन’ चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात बोलतांना डॉ. गिरीष जठार यांनी सांगितले की, हवामानात होणार्‍या पालटाला माणूस कारणीभूत आहे. कारण औद्योगीकरणानंतर पृथ्वीच्या तापमानात पालट व्हायला प्रारंभ झाला. याचे मुख्य कारण म्हणजे जीवाश्म इंधनाचा शोध आणि त्याचा वारेमाप वापर यांमुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे (कर्बवायू) प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत गेले आणि त्यानंतर पृथ्वीच्या तापमानात वाढ झाली. याचा परिणाम म्हणून ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळून समुद्राची पातळी वाढायला लागली आहे. वाढलेले प्रदूषण, हवामानातील पालट आणि त्यामुळे येणार्‍या नैसर्गिक आपत्तींमुळे माणसाचे जीवन असह्य झाले आहे. हा जागतिक प्रश्न असल्यामुळे जगातील सर्वच देशांनी यावर उपाययोजना चालू केल्या आहेत. आपला देशही यामध्ये मागे नाही.

संपादकीय भूमिका

पर्यावरण तज्ञ आणि संशोधक यांनी औद्योगीकरणाचे कितीही दुष्परिणाम सांगितले, तरी या संदर्भात निर्णय घेणार्‍या राज्यकर्त्यांना पैसा आणि मते यांच्यामुळे त्याची जाणीव होत नाही !